पुणे – पूर्व मोसमी पाऊसासह उन्हाच्या तडाख्याचा फटका पालेभाज्यांना बसला आहे. परिणामी, मार्केट यार्डातील तरकारी विभागात आवक कमी झाली आहे. त्यातच होणाऱ्या आवकेमध्ये दर्जाहीन व खराब मालाचे प्रमाण मोठे आहे. त्यातच भाज्यांना मोठी मागणी आहे. विशेषत: ग्राहकांकडून दर्जेदार मालाला मागणी आहे. त्यामुळे घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत.
शहरात कोथिंबीर व मेथीच्या जुडीचे भाव ५० ते ६० रुपये जुडीपर्यंत पोहोचले आहेत. कांदापात व चाकवतचे भाव ४० रुपयांवर गेले आहेत. तर, उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव ३० रुपये जुडी झाले आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात पुणे विभागासह नाशिक व लातूर भागांतून एक ते सव्वालाख कोंथिबीरीच्या जुडींची आवक होत आहे.
तर, मेथीच्या ५० हजार जुड्यांची आवक होत आहे. बाजारात दर्जाहिन पालेभाज्या मोठ्या प्रमाणात असून डाग पडलेल्या मालांची कमी भावाने विक्री करण्यात येत आहे. तर, दर्जेदार पालेभाज्यांना चांगले भाव मिळत आहे. मान्सून आल्यानंतरही पुढील महिनाभर पालेभाज्यांचे चढेच रहातील, अशी शक्यता पालेभाज्या विक्रेत्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
“पूर्व मोसमी पाऊस व उन्हाचा चटका वाढल्याने पालेभाज्यांवर डाग पडले आहेत. त्यामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीत घसरण झाली आहे. बहुतांश ठिकाणी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे, कमी प्रमाणात पालेभाज्या बाजारात दाखल होत आहे. याचा परिणाम पालेभाज्यांचा भावावर झाला आहे. भाव वाढले आहेत.” – चरण वणवे, पालेभाजी विक्रेते.