सातारा -निगडी तर्फ सातारा गावच्या कार्यक्षेत्रातील राजेवाडीत एकाचवेळी 82 करोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली. जिल्ह्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळणारे राजेवाडी पहिले गाव आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या येथील रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून करोनाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.
मौजे निगडी तर्फ सातारा हे गाव सातारा शहरापासून 14 किलोमीटरवर असून गावाची लोकसंख्या 2991 इतकी आहे. गावाच्या कार्यक्षेत्रात राजेवाडी, गावठाण, मागासवर्गीय वस्ती, बसस्थानक मागील परिसर, शेतातील घरे यांचा समावेश आहे. गावात यापूर्वी गाव कृती समितीचे अध्यक्ष, सदस्यांनी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशिक्षण घेऊन लोकांना मार्गदर्शन केले होते. गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली होती. करोना उपाययोजनांबाबत ग्रामस्थ सतर्क असताना मुंबई येथून जुलै महिन्यात गर्भवती माहेवाशिण आली होती.
गाव आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य, सचिवांनी त्यांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला होता. अटी, शर्ती पालन करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. खासगी डॉक्टरांकडे त्यांचे उपचार सुरू होते. प्रसुतीपूर्वीची सोनोग्राफी टेस्ट केली. त्यावेळी संबंधित महिलेची करोना चाचणी करण्यात आली. ती महिला सौम्य प्रमाणात पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दि. 29 जुलैला आला.
त्यांनतर निगडी तर्फ सातारा येथे संशयितांची तपासणी रॅपिड टेस्टद्वारे सुरू केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 11 बाधित रुग्ण आढळले. दि. 17 रोजी राजेवाडी येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. गावात आणि परिसरात बाधित रुग्ण वाढल्यानंतर राजेवाडी येथे दि.18 रोजी आरोग्य विभागाने स्त्रावाचे नमुने घेतले.
यामध्ये पाच बाधित आढळले. उर्वरित संशयितांपैकी दि. 23 रोजी 81 जणांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. आजअखेर 105 वर करोनाबाधितांचा आकडा पोहचला आहे. एकाच वेळी 82 रुग्ण सापडल्याने प्रशासन हादरून गेले. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे गट विकास अधिकारी किरण सायमोते यांनी सांगितले. तहसीलदार आशा होळकर, नायब तहसीलदार कोळेकर, गटविकास अधिकारी किरण सायमोते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.डी. जी. पवार, भाग विस्तार अधिकारी धनावडे, मंडलाधिकारी संजय झनकर यांनी गावास भेट दिली.
आरोग्य विभाग, गाव समितीस करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना दिल्या. यावेळी ग्रामसेवक डी. जे. निकम, बजरंग मोरे, तलाठी अहिरेकर, गट प्रवर्तक श्रीमती निकम, आशा, अंगणवाडी सेविका, सरपंच सौ. जयश्री कुंभार, समिती सदस्य उपस्थित होते.
सोमवारी आणखी चार बाधित
राजेवाडीत मोठ्या प्रमाणात करोनाबाधित आढळल्यानंतर सोमवारी आरोग्य विभागाच्या वतीने गावात सर्व्हे करून शंभर लोकांची अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमध्ये चार जण बाधित आढळून आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. डी. जी. पवार यांनी केले आहे.
निगडी तर्फ सातारा गाव सील
निगडी तर्फ सातारा आणि परिसरात मोठ्या प्रमाणात करोनाबाधित रुग्ण आढळल्याने गावातील सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी गावात प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केले आहे. पोलीस यंत्रने मार्फत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.