पुणे, दि. 12 -बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या साडेचार हजार फुकट्यांवर पीएमपी प्रशानाने जोरदार कारवाई केली आहे. यंदा एकट्या सप्टेंबरमध्ये सुमारे 13 लाख 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पीएमपीने आतापर्यंत एका महिन्यात पकडलेले हे सर्वाधिक फुटके प्रवासी आहेत.
पीएमपीकडून पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 1800 बसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक सेवा दिली जाते. दिवसाला साधारण 10 ते 12 लाख प्रवासी असतात. त्यांच्या तिकीट तपासणीसाठी 200 कर्मचारी आहेत. विना तिकीट प्रवास करताना प्रवासी आढळल्यास त्याच्याकडून 300 रुपये दंड वसूल केला जातो. तर पासची वैधता संपली असली तरी प्रवास करताना आढळला तर त्याच्याकडून हजार रुपये दंड वसूल केला जातो. तर, गेल्या आठ महिन्यांत अशा सुमारे 26 हजार प्रवाशांकडून 75 लाख रुपये दंड वसूल करण्यात आले आहेत.
सप्टेंबरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 13 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्या कालावधीत गणेशोत्सव होता. गर्दीचा फायदा घेत अनेकांनी प्रवासाचा प्रयत्न केला. अशा व्यक्तींवर प्रशासनाने कारवाई केली. – दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी