पुणे, दि. 12 -शहरातील कचऱ्याची वाहतूक हा सर्वांसाठीच कटकटीचा विषय आहे. शिवाय कचरा हस्तांतरण केंद्रांठिकाणी अस्वच्छता वाढते. हे टाळण्यासह या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप करण्यासाठी पालिकेकडून आता कचरा वाहतुकीसाठी इंदौर शहराच्या धर्तीवर “कॅप्सूल’ वापरण्यात येणार आहेत.
कचरा वाहतूक करताना पूर्णत: बंद असलेल्या या कॅप्सूलमुळे वाहतुकीदरम्यान कचरा रस्त्यावर सांडत नाही. तसेच उघडा राहिल्याने त्याची दुर्गंधीही पसरत नाही. कचरा हस्तांतरणाच्या ठिकाणीही या “कॅप्सूल’ स्वयंचलित यंत्रणेला जोडून कचरा हस्तांतरण केले जाते. ही सर्व प्रक्रिया चारही बाजूंनी बंद असलेल्या यंत्रणेत केली जाते. त्यामुळे हस्तांतरण केंद्राच्या ठिकाणी दुर्गंधी पसरत नाही. पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत महापालिकेस घनकचरा व्यवस्थापनासाठी आलेल्या निधीतून 15 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातील काही रकमेतून ही “कॅप्सूल’ खरेदी केली जाणार आहेत. सुरुवातीला ती कात्रज येथील रॅम्पवर वापरली जाणार आहेत.
कचरा संकलनाची सद्यस्थिती
शहरातून संकलित कचरा कॉम्पॅक्टर असलेल्या छोट्या वाहनातून कचरा हस्तांतरण केंद्रापर्यंत नेला जातो. पालिकेकडे सध्या असे 64 कॉम्पॅक्टर असून त्यांची क्षमता 7 ते 8 टनांची आहे. ही कॉम्पॅक्टर वरून उघडली जातात. अनेकदा जादा भरल्याने तसेच उघडे ठेऊन कचऱ्याची वाहतूक केली जाते. परिणामी, रस्त्यावर कचरा पडणे, दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होतो. हस्तांतरण केंद्रावर जागा मिळेल तिथे कॉम्पॅक्टर रिकामा केला जातो. तेथेही कचरा विखूरला जातो. यामुळे दुर्गंधीही पसरते. परिणामी, तक्रारी वाढतात.
..म्हणून इंदौरची मदत
इंदौर महापालिका स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत गेली सात वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे कचरा वाहतुकीसाठी ही यंत्रणा वापरली जाते. त्यामुळे पुणे महापालिकाही प्रायोगिक तत्वावर या यंत्रणेचा वापर करणार आहे.
“कॅप्सूल’चा उपचार
पुण्यातील कचरा वाहतुकीसाठी दाखल होणारी कॅप्सूल वाहने पूर्णत: पॅक आहेत. त्यातील कचरा काढण्याची यंत्रणा स्वयंचलित आहे. हस्तांतरण केंद्रावर हा कचरा एका वाहनातून दुसऱ्या वाहनात सहज टाकता येतो. त्यामुळे कचरा वाहतुकीतील अडचणी सुटणार आहेत.