लक्षवेधी महामोर्चा : विविध वेशभूषा, भारतीय वाद्ये लक्षवेधी
पुणे/टाकळी हाजी – पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी गांधी जयंतीच्या निमित्ताने “आम्हाला शिकवू द्या’ या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या आक्रोश महामोर्चामध्ये 10 हजार शिक्षकांनी भाग घेतला. विविध वेशभूषा व पारंपरिक वाद्यामुळे मोर्चा लक्षवेधी ठरल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक कामे जिल्हा परिषदांमधील दप्तर दिरंगाई, खासगीकरण, समूह शाळा योजना या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने 2 ऑक्टोबर रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन इमारती समोरून आक्रोश आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद तसेच महापालिकेमधील शिक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा शिक्षक संघ, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका संघाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पुणे महापालिका अध्यक्ष नितीन वाणी यांनी दिली.
मुख्याध्यापक पदोन्नती, विज्ञान, समाजशास्त्र पदवीधर, सेवाजेष्ठ शिक्षक यांच्या बदल्यांमध्ये जिल्हा परिषदेचे असंवेदनशील धोरण, शिक्षण सेवक भरती रखडल्याने डोंगरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील रिक्त जागा या विरोधात हलगी व तुतारी वाजवत शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर आक्रोश केला. यावेळी वेशभूषा केलेले महात्मा गांधी, हनुमान आणि पोतराज यामुळे मोर्चाचे लक्ष वेधून घेतले होते.
शिक्षक मोर्चा जिल्हा परिषदेहून विधान भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर गेला. तेथे शिक्षकांच्या मागण्यांची निवेदन देऊन शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चाची सभा घेण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाच्या अनेक धोरणांबाबत शिक्षकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन?
शिक्षकांवरील प्रचंड अशैक्षणिक कामे व अनावश्यक ऑनलाईन आहे यामुळे शिक्षकांचा वेळ वाया जात आहे. यामुळे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होत असल्याची मत यावेळी राज्य शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी व्यक्त केले.
सरकारी शाळेतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षकांनी आंदोलन केले. शिक्षकांच्या हक्कासाठी नाही तर गोरगरिबांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आक्रोश करण्यात आला.
-बाळासाहेब मारणे, जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ पुणे