नवी दिल्ली – करोना संसर्गाशी लढा देण्यासाठी सध्या तरी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यातच देशावर करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार आज पहिल्याच दिवशी विक्रमी 69 लाख लोकांचे लसीकरण झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी या संदर्भात माहिती दिली.
करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केल्यापासून एका दिवसांत 69 लाख लोकांना लसीचा डोस देण्याचा हा सर्वोच्च आकडा आहे. 16 जानेवारीपासून देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून आतापर्यंत देशात 28.7 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी मोफत लसीकरण’ मोहिमेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा फायदा देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि युवकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, तरच आपण करोनाला मात देऊ शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र सरकारकडून करोना प्रतिबंधक लसींचे डोस राज्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. केंद्राकडून विनामूल्य पुरविल्या गेलेले लसींचे डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लोकसंख्या, करोना संसर्गाचे प्रमाण आणि आणि लसीकरणाच्या गतीनुसार पुरविण्यात येणार आहेत. या मोहिमेचा लाभ 18 वर्षांवरील सर्वांना विनामूल्य घेता येणार आहे. त्याचवेळी लसीचे डोस वाया गेल्यास त्याचा लसीकरण मोहिमेवर परिणाम होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या मोहिमेसाठी केंद्र सरकारकडून देशात निर्मित केलेल्या लसींच्या डोसेसपैकी ७५ टक्के डोसेसची खरेदी करण्यात येणार आहे.
दरम्यान यापूर्वी केंद्र सरकारने राज्य आणि खासगी रुग्णालयांना 50 टक्के लसीचे डोस विकत घेण्याची परवानगी दिली होती. तथापि, अनेक राज्यांनी निधीचं कारण पुढं करत असमर्थता दर्शविली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी 8 जून रोजी लसीकरणासंदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचनांची घोषणा केली होती.
लस निर्मितीसाठी आणि नवीन लसींना प्रोत्साहित करण्यासाठी, स्थानिक लस उत्पादकांना थेट खाजगी रुग्णालयात लसी देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र त्यांच्या मासिक उत्पादनाच्या 25 टक्केच डोसेस खासगी रुग्णालयांना देता येतील, असंही नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.