लोकसभेच्या माजी सभापती महाज : लोणी काळभोर येथे पाचव्या वर्ल्ड पार्लमेंटचा समारोप
लोणी काळभोर- आपल्या भोवतालच्या पर्यावरण रक्षणात आपली जबाबदारी प्रत्येक सुज्ज्ञ नागरिकांने ओळखली पाहिजे. त्यानुसार कृती करून केवळ पर्यावरण रक्षणच नव्हे, तर जाणीवपूर्वक प्रयत्न करून त्याचे संवर्धन देखील करावे. विकासाबरोबरच पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी केले.
लोणी काळभोर (त. हवेली) येथे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या वर्ल्ड पार्लमेंटचा समारोप समारंभ प्रसंगी महाजन बोलत होत्या. याप्रसंगी अमेरिकन गांधी बर्नी मेयर, नवी दिल्ली येथील इंडियन काउंसिल ऑफ फिलॉसॉफीकल रिसर्चचे अध्यक्ष डॉ. आर. सी सिन्हा, नवी दिल्ली येथील अखिल भारतीय दर्शन परिषदेचे सचिव प्रा. अंबिका दत्ता शर्मा, दिल्ली विद्यापीठाचे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. अशोक व्होरा, संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी डब्ल्युपीयुचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्रा. डॉ. मंगेश तु. कराड आदी उपस्थित होते. यावेळी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय दर्शन परिषद व नवी दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफीकल रिसर्च यांच्या वतीने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांनी केलेल्या अद्वितिय कार्याबद्दल विश्व-विज्ञान-दार्शनिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सुमित्रा महाजन म्हणाल्या की, नदीवरील अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. नदीचे प्रवाह नष्ट केल्यामुळे त्याचे परिणाम भागावे लागत आहेत. महिला ही नदीचे रुपक आहे. मानवी हस्तक्षेपामुळे सृष्टीत फेरबदल होत आहेत. पृथ्वी वाचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या समारोप समारंभात तीन दिवस चाललेल्या पाचव्या वर्ल्ड पार्लमेंटमध्ये सात ठराव सर्वानुमते पास करण्यात आले. त्याचे वाचन प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी केले.
- सर्व धर्म एकच आहे. शांतीपूर्ण समाज निर्मितीची सध्याच्या काळात गरज आहे. शांतीसाठी सर्वांनी एकत्र यावे. या घुमटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानाचे वेगळे स्वरूप जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, वैश्विक भारतीय संस्कृतीचे दर्शन जगाला घडणार आहे.
– प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, संस्थापक अध्यक्ष, एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी