मुंबई – शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ठाकरे शिंदे संघर्षाला सुरुवात झाली. शिंदे गटाने वारंवार आम्ही शिवसेना सोडली नसल्याचे सांगितले. त्यातच शिंदे गटाकडून दादर येथे प्रति शिवसेना भवन उभारले जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर आता शिंदे गटातील आमदाराने स्पष्टीकरण दिले आहे.
शिवसेना भवन हे शिवसैनिकांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिशा देण्यासाठीचे अनेक निर्णय याच शिवसेनाभवनमधून जाहीर केले. प्रती शिवसेना भवन होणार अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच मंत्री उदय सामंत यांनी याबाबतचा खुलासा करणारे एक ट्विट केले आहे.
उदय सामंत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,”मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मा. एकनाथजी शिंदे करत आहेत हा गैरसमज पसरवला जात आहे..मा. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता याव ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे..शिवसेना भवन बद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील”.
मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मा. एकनाथजी शिंदे करत आहेत हा गैरसमज पसरवला जात आहे..मा. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता याव ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे..शिवसेना भवन बद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील.
— Uday Samant (@samant_uday) August 12, 2022
दिवसेंदिवस ठाकरे आणि शिंदे गटामधील संघर्ष वाढत चालला आहे. आधी गट तयार झाला त्यानंतर सरकार स्थापन केलं. आता कार्यालय देखील सुरु होणार असल्यामुळे शिंदे गटाची रचना नेमकी कशी असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गट देखील शिवसेनेप्रमाणे शाखा सुरु करणार का? याकडे शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.