फॅक्ट चेक : करोना लस घेतल्यानंतर खरंच चुंबकीय शक्ती निर्माण होते? जाणून घ्या सत्य…

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक येथील एका इसमाने, करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर आपल्यामध्ये चुंबकीय शक्ती निर्माण झाल्याचा दावा केला होता. आपला दावा सिद्ध करण्यासाठी या इसमाने एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. यामध्ये त्या व्यक्तीच्या अंगावर काही वस्तू व नाणी चिटकत असल्याचं दिसत होत. या व्हिडीओमुळे समाज माध्यमांवर लसीबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.

मात्र लसीमुळे खरंच अशाप्रकारे चुंबकीय शक्ती निर्माण होऊ शकते काय? हा व्हिडीओ खरा आहे की खोटा? असे अनेक प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. या सर्व प्रश्नांना केंद्र सरकारच्या पब्लिक इन्फॉर्मेशन ब्युरो या संस्थेने उत्तर दिलं असून याबाबतचा संभ्रम दूर केला आहे.

लसीमुळे चुंबकीय शक्ती? PIB म्हणतं…

‘लसीकरणामुळे चुंबकीय शक्ती निर्माण झाल्याचे दावे पूर्णपणे निराधार आहेत’ असं PIB ने स्पष्ट केलं.

तसेच, “करोना लस शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण करू शकत नाही. करोना प्रतिबंधात्मक लसी या पूर्णपणे सुरक्षित आहेत. तसेच या लसी बनवताना त्यामध्ये कोणत्याही धातूचा वापर करण्यात आलेला नाही.” असं देखील स्पष्ट केलं आहे.

“लसीबाबत खोटी व निराधार माहिती पुरवणाऱ्यांवर विश्वास न ठेवता विषाणू संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण करून घ्या” असे आवाहनही PIB ने केलं आहे.

रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे अर्थात सीडीसीने यापूर्वीच चुंबकीय शक्ती निर्माण होत असल्याचे दावे साफ खोटे असल्याचं स्पष्ट केलंय.

व्हायरल व्हिडीओमध्ये लोकांच्या शरीराला धातूच्या वस्तू कशा चिकटतात?  

तज्ज्ञांच्या मते मानवी शरीरावरील त्वचा तेलकट असल्यास शरीराला काही वस्तू चिकटतात. अंगावर घाम असेल तरी देखील असं होऊ शकत. काही लोक प्रसिद्धीसाठी क्लुप्त्या आजमावून देखील असे व्हिडीओ तयार करू शकतात अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

करोनाचे साईड इफेक्ट्स कोणते?

तुमच्या शरीरामध्ये जेव्हा अँटीजेन (ऍटिबॉडीज निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ) सोडले जातात तेव्हा तुमच्या शरीराने त्याला दिलेली प्रतिक्रिया म्हणजेच साईड-इफेक्ट्स. अँटीजेन शरीरात प्रवेश करताच तुमचे शरीर त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होते.

प्रथम पांढऱ्या पेशी त्याच्याशी लढा देतात. यासोबतच काहींना लस घेतल्यानंतर ताप, थकवा, स्नायू दुखणे, वेदना, थंडी वाजणे अशा तक्रारी जाणवू लागतात. हे लसीचे ‘कॉमन’ अर्थात सामान्य साईड-इफेक्ट्स म्हणून देखील ओळखले जातात.

तर काहींमध्ये यापेक्षा वेगळे साईड-इफेक्ट्स देखील पाहायला मिळतात.     

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.