लखनौ -उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाला (बसप) मोठा राजकीय हादरा बसण्याची चिन्हे आहेत. त्या पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या पाच आमदारांनी समाजवादी पक्षात (सप) प्रवेश करण्याचे सूतोवाच केले आहे.
उत्तरप्रदेशात बसपचे 18 आमदार आहेत. त्या राज्यात मागील वर्षी राज्यसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीतील बसपच्या उमेदवाराला विरोध दर्शवल्याने पक्षाने सात आमदारांना निलंबित केले. त्यातील पाच आमदारांनी मंगळवारी येथे सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली.
त्यानंतर संबंधित आमदारांनी सप प्रवेशाचे मन बनवल्याचे संकेत दिले. उत्तरप्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे त्या राज्यातील राजकीय हालचालींना आतापासूनच वेग आला आहे.