मुंबई – शिवसेना खासदार, नेते संजय राऊत यांच्या कुटुंबियांची वाईन व्यावसायिकांबरोबर पार्टनरशीप आहे. राऊतांच्या परिवाराने काही महिन्यांपूर्वी एका वाईन व्यावसायिकासोबत हा व्यावसायीक करार केला आहे. त्यांनी जाहीर करावे की त्यांची पत्नी, त्यांची कन्या यांच्या नावावर किती पार्टनरशीप आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
किरीट सोमय्या म्हणाले, मॅगपी ग्लोबल लिमिटेड या अशोक गर्ग यांच्या कंपनीसोबत राऊत यांची पार्टनरशीप आहे. त्यांचा हॉटेल, पब, क्लब आणि काही ठिकाणी वाईन वितरित करण्याचा व्यवसाय आहे. राऊत कुटुंबियांनी मॅगपीसोबत 16 एप्रिल 2021 रोजी करार केला आहे. यात विधिता आणि पूर्वशी या संजय राऊत यांच्या दोन्ही मुली या कंपनीत संचालक आहेत.
मॅगपी कंपनीचे मूळ नाव मादक प्रायव्हेट लिमिटेड असे आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल 100 कोटींची आहे. कंपनीने 2 जानेवारी रोजी या कंपनीचा मुख्य व्यवसाय वाईन वितरित करण्याचा असल्याचे शासनाला कळवले. त्यानंतर राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन ठेवण्याचा निर्णय घेतला, असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.