पुणे – दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शहरातील सुमारे 3 लाख 20 हजार शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. शिधा देण्यासाठी नेमलेल्या पुरवठादाराकडून अजूनही पूर्णपणे साहित्य पुरवठा विभागाकडे पोहचलेच नाही.
आतापर्यंत शहरातील सुमारे 93 हजार नागरिकांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचला आहे. दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आलेला असताना अजूनही सुमारे 2 लाख 27 हजार शिधापत्रिकाधारक आनंदाचा शिध्यापासून दूर राहिले आहेत. शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मागील वर्षी दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात करण्यात आली.
100 रुपयांमध्ये पाच पदार्थांचा समावेश असलेले शिधा देण्यात आले. आता शासनाने यामध्ये दोन पदार्थांची वाढ केली असून मैदा आणि पोहे यांचा सुध्दा समावेश करण्यात आला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 3 लाख 20 हजार 443 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा कीटचे वाटप केले जाणार आहे. ई-पॉसद्धारे आनंदाचा शिधा याचे वितरण रेशन दुकानांमधून केले जाणार आहे.
निकृष्ट दर्जाचे कीट स्वीकारू नये
शिधा कीटमध्ये समाविष्ट असलेल्या पदार्थ्यांचे अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या मानकाची पूर्तता करीत असल्याचे एनएबीएल अधिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र पुरवठादाराकडून आल्यानंतरच शिधा कीट प्रशासनाने स्वीकारावे. निकृष्ट दर्जाचे कीट स्वीकारू नये, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.