पुणे – शहरात कथित “तोडफोड गॅंग’ने तोंड वर काढले असून, टोळक्याने तब्बल 28 वाहनांची तोडफोड केली. ही घटना लोहगाव येथील कलवड वस्ती परिसरात सोमवारी पहाटे घडली. विमाननगर पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले. यातील दोघे अल्पवयीन आहेत.
याप्रकरणी इनायत अली शौकत अली अन्सारी (27, रा. कलवडवस्ती) यांनी तक्रार दिली असून हसिम खलील शेख (18, रा. कलवड वस्ती) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघेही आरोपी एका
दुचाकीवरून कलवड वस्तीतील एका धर्मस्थळाजवळील मैदानात आले. तेथे त्यांनी ऑल्टो, इनोव्हा, ऍसेंट, होंडा सिटी आदी 16 वाहनांची तोडफोड केली.
तेथून पुन्हा पानसरे वस्ती येथे गेले तेथे टेम्पो, कार आणि पाच रिक्षांची तोडफोड केली. यानंतर पुन्हा थिटे वस्ती येथे जाऊन वाहनांची तोडफोड केली. या तोडफोडीत तब्बल 28 वाहनांचे नुकसान झाले. यातील एका आरोपीच्या हातात दोन पालघन तर एकाच्या हातात कोयता होता. दुचाकी चालवणाऱ्या आरोपीने तोंडाला रुमाल बांधला होता. ही माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.
यानंतर रात्रपाळीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप करपे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासत इनायतला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत इतर दोन आरोपींनाही ताब्यात घेतले गेले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्रकुमार वारंगुळे करत आहेत.
वर्चस्ववादातून घटना घडल्याचा अंदाज
यातील मुख्य आरोपीने वयाची 18 वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. तो अल्पवयीन असताना त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. वस्तीमध्ये वर्चस्व पसरवण्याच्या हेतूने त्याने हे कृत्य केल्याचा अंदाच आहे.