पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर दोन्ही गटांनी पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये काही दिवसांतच गटबाजी उफाळून आली आहे. राष्ट्रवादीमध्ये शहराध्यक्ष, युवक शहराध्यक्ष आणि इतर असे तीन गट दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे काळेवाडीत सुरू केलेल्या पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उद्घाटनापूर्वीच बंद करण्याची नामुष्की पक्षावर आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये 2 जुलैला उभी फूट पडली. पक्षात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार असे दोन स्वतंत्र गट झाले. अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पक्षात फूट पडल्यानंतर शहरातील पक्ष संघटना, आमदार, बहुतांशी माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. अगदी मोजकेच पदाधिकारी शरद पवारांच्या गटात राहिले.
युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्यासह काहींनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा भूमिका घेतली. कामगार नेते काशिनाथ नखाते, शेख यांच्या पुढाकारातून वर्गणी काढत काळेवाडीत पक्षाचे जनसंपर्क कार्यालय थाटले. ऑक्टोबर महिन्यात शरद पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्याचे नियोजन केले होते. दरम्यानच्या काळात तुषार कामठे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा आली. काळेवाडीतील कार्यालयाला शहराध्यक्ष कामठे यांनी विरोध केला. महापालिका परिसरातच जनसंपर्क कार्यालय असावे अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे उद्घाटनापूर्वीच काळेवाडीतील कार्यालय बंद करण्याची नामुष्की ओढविली आहे.
कार्यालयासह इतरही कारणांवरुन पक्षात गटबाजी सुरू असल्याच्या चर्चा सध्या जोरात आहेत. आमदार रोहित पवार किंवा अन्य नेते शहरात आले की त्यांच्या पुढे-मागे काही पदाधिकारी करत आहेत. ते गेले की पक्षाच्या वतीने शहरात काहीच कार्यक्रम होत नसल्याची चर्चा आहे. तसेच पिंपरी विधानसभा मतदार संघावर जास्त भर दिला जात असल्यामुळे भोसरी आणि चिंचवडमधील पदाधिकारी नाराजी व्यक्त करत आहेत. शहरात पक्षाचे बोटावर मोजण्या इतके पदाधिकारी राहिले आहेत. अशा परिस्थितीतही गटबाजी वाढत असल्यामुळे पक्षाच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय आहे.
शहरातील कार्यकर्त्यांना, नागरिकांना सोयीस्कर होईल, यासाठी पक्ष कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असणे गरजेचे आहे. त्यानुसार काळेवाडीतील कार्यालय बंद करून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यालयाचे काम सुरू केले आहे. 19 नोव्हेंबरला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
तुषार कामठे, शहराध्यक्ष, (राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरद पवार गट)
पक्ष कार्यालय चिंचवड विधानसभा मतदार संघ नको तर पिंपरी विधानसभा मतदार संघात असावे, असा काहींचा आग्रह होता. त्यामुळे काळेवाडीतील कार्यालय बंद केले आहे. तीन महिने कार्यालयाचे आम्ही भाडे भरले.
– इम्रान शेख युवक अध्यक्ष (राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरद पवार गट)