विरळ ‘ओझोन’ आणि आरोग्य …

डॉ. मेघश्री दळवी

संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण उपक्रमाच्या अंतर्गत (युनेप- युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम) दरवर्षी 16 सप्टेंबरला जगभर “जागतिक ओझोन दिवस’ साजरा केला जातो. एखाद्या वायूसाठी म्हणून वर्षामधला एक दिवस खास राखून ठेवणे हे नवलच, तेही वातावरणात अत्यल्प प्रमाणात आढळणाऱ्या ओझोनसाठी. पण त्याला कारणही तसंच सबळ आहे. पृथ्वीच्या वातावरणाच्या थरामध्ये ओझोनचे प्रमाण कमी झाल्याने त्याचे थेट परिणाम मानवी आरोग्यावरही होतात. कसे ते जाणून घेऊया…

आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या सूर्यप्रकाशात तीन प्रकारची किरणं असतात. कमी ऊर्जा आणि जास्त तरंगलांबी असलेल्या इन्फ्रारेड (अवरक्‍त) किरणांमुळे आपल्याला उष्णता मिळते. त्याहून अधिक ऊर्जेच्या दृष्य किरणांमुळे आपल्याला आजूबाजूचं जग दिसू शकतं. तर जास्त ऊर्जा आणि कमी तरंगलांबीचे अतिनील म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरण हे आपल्या आरोग्यासाठी फार घातक असतात.

शरीरावर अतिनील किरणांचा जास्त मारा झाला तर त्वचेची कधीही न भरून येणारी हानी होते. त्वचा लालसर होणे, त्वचेचा दाह होणे, बारीक पुरळ उठणे ही सुरुवातीची लक्षणं. हा मारा नियमित झेलावा लागला तर त्वचेवर अकाली सुरकुत्या येऊ शकतात. या सुरकुत्या वाईट दिसतात एवढाच वरवरचा धोका नसतो, तर त्वचा नाजूक झाल्याने तिची नैसर्गिक प्रतिकारशक्‍ती घटते आणि त्वचेचे इतर रोग होण्यास आमंत्रण मिळतं.

अतिनील किरणांचं प्रमाण जास्त झालं किंवा सतत अतिनील किरण त्वचेवर पडत राहिले, तर कार्सिनोमा आणि मेलानोमा या दोन्ही प्रकारचे त्वचेचे कर्करोग होऊ शकतात. डोळ्यांसाठी देखील अतिनील किरण धोकादायक असतात. काही विशिष्ट प्रकारचे मोतीबिंदू (कॅटॅरॅक्‍ट) होण्यामागे अतिनील किरणे असतात, हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. तसेच डोळ्यातील काही ऊती (टिश्‍यूज) अतिनील किरणांमुळे वाढून डोळा अंशत: निकामी होऊ शकतो.

डोळ्याच्या आजूबाजूची त्वचा करपून तिथे पुष्कळ सुरकुत्या पडणे आणि त्याचा परिणाम म्हणून त्वचेचा कर्करोग होण्याची शक्‍यता वाढणे याला अतिनील किरण हे कारणीभूत ठरतात. म्हणूनच डोळे आणि बाजूची नाजूक त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी अतिनील किरण पूर्णपणे रोखणारे सनग्लासेस वापरण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या एकूणच रोगप्रतिकारक शक्‍तीवर अतिनील किरणांचे दुष्परिणाम होतात यावर सखोल संशोधन झालेले आहे. प्रकाश संश्‍लेषणावर परिणाम झाल्याने झाडांची वाढदेखील त्यामुळे खुंटते.

अतिनील किरणांमुळे देवमाशांमध्ये कर्करोग आणि त्वचेची हानी झाल्याचे निष्कर्ष आहेत, तर पिकं रोगराईला बळी पडण्यामागे अतिनील किरणांचं वाढलेलं प्रमाण हे एक कारण असल्याचं अभ्यासातून निष्पन्न झालं आहे. त्यातले सर्वाधिक ऊर्जा असणारे अल्ट्राव्हायोलेट-सी प्रकारचे किरण अगदी थोड्या काळासाठीदेखील शरीरावर पडले तरी ते प्राणघातक ठरू शकतात. केवळ आपल्यासाठी नाही, तर सर्व प्रकारच्या सजीवांसाठी. पण हे प्राणघातक अल्ट्राव्हायोलेट-सी किरण पृथ्वीवर कधीही पोहोचू शकत नाहीत आणि त्यामागे आहे आपलं ओझोनचं सुरक्षा कवच!

ऑक्‍सिजनच्या रेणूमध्ये (मॉलिक्‍यूलमध्ये) ऑक्‍सिजनचे दोन अणू (ऍटम) असतात. ऑक्‍सिजनचे तीन अणू एकत्र आले तर बनतो ओझोनचा रेणू. फ्रेंच शास्त्रज्ञ चार्ल्स फॅब्री आणि हेन्‍री बिसां यांनी 1913 मध्ये ओझोनचा शोध लावला. पुढे ओझोनचं कृत्रिमरीत्या संश्‍लेषण करण्यासाठी प्रक्रिया विकसित करण्यात आली. आज जीवाणूंचा नाश करण्यासाठी, जलशुद्धीकरणासाठी आणि काही औद्योगिक प्रक्रियांमध्ये ओझोन कृत्रिमरीत्या तयार करून वापरला जातो. मात्र, अतिनील किरण रोखणारा हा ओझोन थेट संपर्कात आला तर माणसांना धोकादायक ठरू शकतो. श्‍वासातून शरीरात गेलेला ओझोन श्‍वसनसंस्थेला इजा पोहोचवतो आणि फुप्फुसांची क्षमता कमी करतो.

ओझोनचे रेणू शरीरातील इतर अणूरेणूंशी संयोग पावले तर आणखीच हानी करू शकतात. म्हणून या ठिकाणी तयार होणारा ओझोन काळजीपूर्वक हाताळावा लागतो. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणात ओझोनचं प्रमाण अत्यंत कमी असतं. सुमारे 20 ते 30 किलोमीटर उंचीवरच्या स्ट्रॅटोस्फिअर या वातावरणाच्या थरात बहुतांशी ओझोन आढळतो. तोही ऑक्‍सिजनच्या एक कोटी रेणूंमागे ओझोनचे केवळ तीन रेणू इतकाच. या ओझोन थरामुळे बरेचसे अतिनील किरणे वरच्यावर रोखले जातात.

अल्ट्राव्हायोलेट-ए प्रकारचे तुलनेने कमी ऊर्जा असलेले अतिनील किरण आपल्यापर्यंत पोहोचतात. मात्र, त्यांच्यामुळे होणारी हानी कमी असते. त्याहून थोडी जास्त ऊर्जा असलेले अल्ट्राव्हायोलेट-बी प्रकारचे अतिनील किरण त्वचेला इजा पोहोचवून कर्करोगाला आमंत्रण देतात. ओझोनचा थर यातले सुमारे 97 टक्‍के किरण अडवून धरतो. उच्च ऊर्जेचे अल्ट्राव्हायोलेट-सी किरण तर हा थर संपूर्णपणे रोखतो; एखाद्या प्रचंड ढालीसारखं. ओझोन दिवसाचं महत्त्व आहे हे याच कारणाने.

जागतिक ओझोन दिनासाठी विशिष्ट थीम घेऊन त्यावर आधारित वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. यावेळची थीम आहे “32 वर्षे आणि सुधारणा’. बत्तीस वर्षांपूर्वी कॅनडामधल्या मॉन्ट्रियल शहरात झालेली परिषद आणि ओझोन थराविषयी या परिषदेत घेतलेले निर्णय हा या थीमचा संदर्भ आहे. ओझोन वायूचं पृथ्वीभोवतीचं संरक्षक कवच कमकुवत होत गेल्याचं ध्यानात आलं. साधारण 1980 च्या सुमारास. त्यावर संशोधन सुरू झालं आणि लवकरच अंटार्क्‍टिकावरच्या ओझोनच्या थराला भलं मोठं भगदाड पडल्याचं दिसून आलं.

एवढा मोठा बदल नक्की कशाने होतोय, हे मग शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. यामागे होता वायूंचा एक गट कार्बन टेट्राक्‍लोराइड, कार्बन टेट्राफ्लुओराइड, क्‍लोरोफ्लुरोकार्बन आणि फ्रिऑन, क्‍लोरिन, ब्रोमीन यासारखे वायू. त्यातला मुख्य होता मानवनिर्मित वायू क्‍लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी).
अंटार्क्‍टिकासोबत इतर कित्येक ठिकाणी ओझोन थराला लहानमोठी खिंडारं पडलेली या अभ्यासातून दिसून आली. त्यानुसार आपल्या आरोग्याला धोका असल्याचा इशारा तत्काळ जाहीर करण्यात आला.

भरदुपारी उन्हात जाणे टाळावे, सनस्क्रीन लावूनच बाहेर पडावे अशा सूचना ध्रुवीय प्रदेशाजवळच्या देशांमध्ये सुरू झाल्या. ओझोन थराला पडत जाणारी खिंडारं हा सर्वांसाठी एक अतिशय मोठा धक्का होता. आपण आपल्या हाताने पृथ्वीचा आणि आपलाही विनाश करतो आहे याचा हा भरभक्कम पुरावा होता. साहजिकच सगळे शास्त्रज्ञ एकत्र आले आणि आपण माणसांनी काहीतरी करायला हवं या भूमिकेवर ठाम उभे राहिले. या बाजूने जनमतसुद्धा तयार झालं. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे वर्ष 1987 मध्ये कॅनडामधल्या मॉन्ट्रियल शहरात 24 देशांनी एकत्र येऊन सीएफसीच्या उत्पादनावर आपणहून निर्बंध घालून घेतले. पर्यावरणाच्या चळवळीचा हा एक महत्त्वाचा टप्पा होता. पुढे आणखी देश यात सामील झाले आणि सीएफसीला हद्दपार करण्याचा सर्वांनी चंगच बांधला.

या घटनेला 32 वर्षे झाली. संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या एका ताज्या अहवालानुसार जवळजवळ 99 टक्के जागी सीएफसीचा वापर थांबला आहे. त्याच्या जागी इतर वायू असलेली उत्पादनं आपण सामान्य माणसांच्या आता अंगवळणी पडली आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षात ओझोन थराला जागोजागी पडलेली खिंडारं हळूहळू कमी होत आहेत. वर्षाला एक ते तीन टक्के सुधारणा थोडी वाटली तरी तिचा एकत्रित परिणाम निश्‍चितच मोठा आहे.

उत्तर गोलार्धात ओझोन थराला पडलेली लहानमोठी छिद्रं वर्ष 2030 पर्यंत बुजतील असा शास्त्रज्ञांचा अदमास आहे, तर दक्षिण गोलार्धातली साधारण वर्ष 2050 पर्यंत. अंटार्क्‍टिकावरच्या ओझोन थराचं भगदाड सर्वात मोठं आहे, तो थर सुमारे 2060 पर्यंत पूर्ववत होईल. ओझोन पुन्हा एकदा आपलं मजबूत संरक्षक कवच आपल्याभोवती राखणार, ही बातमी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच आशादायक आहे. म्हणूनच यावर्षीचा जागतिक ओझोन दिवस गेल्या 32 वर्षांतल्या सुधारणा आनंदाने साजरा करतो आहे.

असे आहेत गंभीर परिणाम…
प डोळ्यांसाठी अतिनील किरणं धोकादायक असतात. काही विशिष्ट प्रकारचे मोतीबिंदू (कॅटरॅक्‍ट) अतिनील किरणांमुळं होतात.
प अतिनील किरणांमुळं डोळ्याच्या आजूबाजूची त्वचा करपून तिथे पुष्कळ सुरकुत्या पडतात. त्यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्‍यता वाढते.
प अतिनील किरण रोखणारा ओझोन थेट संपर्कात आला तर धोकादायक ठरतो. श्‍वासातून शरीरात गेलेला ओझोन श्‍वसनसंस्थेला इजा पोहचवतो आणि फुप्फुसांची क्षमता कमी करतो.
प अल्ट्राव्हायोलेट किरणांचा सतत मारा झाल्यामुळे त्वचा लालसर होते, त्वचेचा दाह होतो, बारीक पुरळ उठायला सुरुवात होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here