तंबाखू टाळणे श्रेयस्करच

डॉ. अनिल आलुरकर

तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलीम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.
तंबाखू आरोग्याला घातक आहे. तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे माहीत असूनही अनेक तरुण आज तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत आणि धोके माहीत असूनही जात आहेत, हे चिंताजनक आहे.

आज युवकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन वाढत आहे. यात धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत तर दिवसागणिक वाढ होत आहे. हे व्यसन करणाऱ्यांपैकी 70 टक्के लोकांचा मृत्यू हृदयविकाराने होतो. तंबाखूच्या वाढत्या व्यसनासह हृदयविकार व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. सिगारेटच्या व्यसनामुळे अचानक हार्टऍटॅकही येऊ शकतो. सिगारेटचा धूर हृदय जाळतोय अन्‌ ज्यांचे हृदय जळतेय, त्याला ते माहीत नाही. सिगारेटच्या धुरात कार्बन मोनॉक्‍साइडचे प्रमाण जास्त असते. प्रदूषित हवेतून जेवढया प्रमाणात हा वायू शरीरात जाऊ शकतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात सिगारेटच्या धुरामुळे जातो. धुराबरोबर कार्बन मोनॉक्‍साइड वायू अधिक, तर प्राणवायू शरीरात कमी शोषला गेल्याने शरीरातील पेशींना प्राणवायू कमी मिळते, यामुळे धमनी-काठिण्य वाढते. रक्तवाहिन्या अशुद्ध होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो.

सिगारेटच्या धुरातील कार्बनचे कण व इतर अपायकारक द्रव्यांमुळे श्वसनावर परिणाम होतो. पेशींना प्राणवायू कमी मिळतो. त्यामुळे वायुकोषांची लवचिकता कमी होते. कायमस्वरूपी खोकला व दम लागणे, श्वसनविकार, फुफ्फुसाचा कर्करोग असे आजार संभवतात. कर्करोग तज्ज्ञांच्या मते 50 टक्के लोकांना तंबाखूजन्य पदार्थामुळे कर्करोग होतो. सध्या कर्करोग होण्याचे वय अलीकडे आले आहे. सध्या 25-30 या वयोगटातील तरुणांना कर्करोग होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. अगदी 9-10 वर्षांच्या मुलांनाही कर्करोग झाल्याचे वास्तव समोर येत आहे. याची कारणे शोधायची झाल्यास शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थाचे लागलेले वाढते व्यसन कारणीभूत आहे.

शाळेच्या आवारात वा आवारापासून 100 मीटपर्यंत तंबाखू, गुटखा इत्यादींची विक्री न होऊ देण्यास कायदा अस्तित्वात आहे, पण तो फक्त कागदावर असल्याचे दिसत आहे. शाळेत जाता-येताना मुले सर्रास गुटखा, तंबाखूजन्य सुपारी वा अन्य उत्पादनांचा आस्वाद घेतात, याची पालकांना सुतराम कल्पना नसते व लक्षणे दिसू लागतात, तेव्हा उशीर झालेला असतो. मित्र-मैत्रिणींच्या दबावाला बळी पडून वा नैराश्‍यामुळे तंबाखू सेवन करणा-यांचा वर्गही मोठा आहे. 25 टक्क्‌यांच्या जवळपास लोक तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन करतात.
एका स्वयंसेवी संस्थेने 15 वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांचे सर्वेक्षण केल्यावर त्यात असे समोर आले की, उत्तर प्रदेशातील प्रत्येक सहावी महिला धूम्रपान करत आहे. सध्या उत्तर प्रदेशामध्ये 2009-10 मध्ये झालेल्या सर्वेक्षणापेक्षा धूम्रपान करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. तंबाखूजन्य उत्पादनांचा उपयोग करणाऱ्या पुरुषांची सरासरी संख्या 52 टक्के आहे, तर तेच प्रमाण महिलांमध्ये 17.7 टक्के इतके आहे. तंबाखूचा वा तिचे कोणत्यातरी स्वरूपाचे सेवन अहवालानुसार प्रत्येक सहावी महिला करत आहे.

गुटखा, खैनी, बिडीचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये मजूर महिलांची संख्या जास्त असून सुरुवातीला शौक म्हणून केलेली सवय आता त्यांचे न सुटणारे व्यसन बनत चालल्याचे या अहवालातून समोर येत आहे. पान मसाला, गुटखा, सुपारी, इ. सवयी पूर्णपणे थांबवाव्यात. यासाठी बंदीबरोबरच लोकशिक्षण करावे लागेल. तंबाखूमुळे शरीराची किती व कशी हानी होते, याच्या जाहिराती ठिकठिकाणी दिसतात, पण त्याचा परिणाम शून्य दिसतो. भारतात तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या 27 कोटींपेक्षा जास्त आहे. जर योग्य खबरदारी घेतली नाही तर 2020 पर्यंत तंबाखूच्या पदार्थामुळे दरवर्षी मरण पावणाऱ्यांची संख्या सुमारे 911 कोटी असेल. इंटरनॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोजेक्‍टकडून (आयटीसीपी) हा इशारा देण्यात आला आहे. कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी 25 टक्के मृत्यू महिलांचा होतो.

या प्रोजेक्‍टच्या माध्यमातून केल्या गेलेल्या एका सर्व्हेत असे आढळून आले की, तंबाखू, गुटखा, जर्दा, पानमसाला अशी चघळण्याची प्रॉडक्‍टस जास्त वापरली जातात. तंबाखूच्या अशा उत्पादनांमुळे तोंडाच्या कर्करोगासह अनेक इतर कर्करोग व हृदयरोग असे आजारही संभवतात. या सर्व्हेत असेही दिसले की, तंबाखूची उत्पादने वापरणाऱ्यांपैकी बहुसंख्य लोकांना दुष्परिणामांबाबत, त्यामुळे होणाऱ्या धोक्‍यांबाबत माहिती असते, पण तरी त्यांना व्यसन सोडण्याची इच्छा नसल्यामुळे अशी उत्पादने वापणाऱ्यांच्या संख्येत भर पडत आहे.

दरवर्षी 60 लाख लोकांचा मृत्यू
भारतात तंबाखू नियंत्रणासाठी कायदा आहे, पण कडक अंमलबजावणीअभावी तो फक्त कागदावरच राहिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार तंबाखूमुळे जगात दरवर्षी 60 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर हा आकडा 2030 पर्यंत 80 लाख होण्याची शक्‍यता आहे. जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणात (जीएटीएस-2) महाराष्ट्रातील अल्पवयीन व तरुणांमधील तंबाखू सेवनाबाबत चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील प्रौढ मंडळींच्या तंबाखू सेवनात गेल्या सात वर्षात 31.4 टक्क्‌यांवरून 26.6 टक्क्‌यांपर्यंत घट नोंदवण्यात आली आहे, पण 15 ते 17 वयोगटातील नवतरुणांच्या तंबाखू सेवनात मात्र 2.9 टक्क्‌यांवरून 5.5 टक्क्‌यांपर्यंत वाढ झाली आहे. तंबाखू सेवन वाईटच, पण तरी तंबाखू सेवनास सुरुवात करण्याचे सरासरी वयही 18.5 (जीएटीएस-1) वरून 17.4 वर्षावर (जीएटीएस-2) येऊन पोहोचले आहे.
तंबाखूजन्य पदार्थावर लावलेल्या जीएसटी करामुळे सरकारच्या तिजोरीत कोटयवधी रुपयांचा महसूल गोळा होत असला तरी तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे 6 लाख व्यक्तींचा दरवर्षी मृत्यू होत असल्याचे उघडकीस आले आहे. तर दरवर्षी 8 लाख नवे रुग्ण आढळत असून; यातील 3 लाख 20 हजार रुग्ण तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत, अशी माहिती कॅन्सर पेशंट्‌स एड असोसिएशन (सीपीएए)ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात आहे.

तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून; एकटया मुंबईत हे प्रमाण 25.4 टक्के आहे. याशिवाय लहान मुलांतही धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जागतिक तंबाखूविरोधी दिनाफनिमित्त प्रबोधनावर भर दिला जात आहे. धूम्रपान करणाऱ्यांसोबतच याचा विपरित परिणाम इतरांवर होतो. तंबाखूच्या उत्पादनांची उपलब्धता आणि घरात एखाद्याला धूम्रपानाची असलेली सवय यामुळे लहान वयात मुलांना विविध व्यसनांची सवय होते. सध्या भारतात वयाच्या अवघ्या नवव्या आणि दहाव्या वर्षी धूम्रपानास सुरुवात करणारी मुले आहेत.

त्यामुळे धूम्रपानाशी निगडित आजारांमुळे मृत्यू होण्याची शक्‍यताही अधिक असते. धूम्रपान करणाऱ्या 70 टक्के लोकांना धूम्रपानामुळे होणा-या दुष्परिणामांची जाणीव असते आणि यातील 50 टक्के लोकांची ही सवय सोडण्याची इच्छा असते, मात्र सततच्या धूम्रपानाच्या सवयीमुळे संबंधित व्यक्तीच्या शरीरावर निकोटिनचा प्रभाव पडलेला असतो, त्यामुळे ही सवय सुटता सुटत नाही. निकोटिन रिप्लेसमेंट थेरपीफ (एनआरटी) हा उपचार करून धूम्रपानाची सवय सोडता येते, मात्र कायमस्वरूपी हे व्यसन सोडणे व्यक्तीच्या इच्छेवरच अवलंबून असते.

आपली जबाबदारी
व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा.

गुटखा :
गुटखा म्हणजे तंबाखू, चुना,सुपारी व एक विषारी द्रव्य आणि सुगंधी मसाला, इ. चे मिश्रण असते. अनेक नावांनी गुटखा विकला जातो. पान मसाला, गुटखा, सुपारी, आदी पदार्थ चघळणाच्या सवयीमुळे हा आजार दिसून येतो. या आजारात तोंडातल्या मऊ त्वचेखालील भाग निबर होत जातो. यामुळे तोंडाची हालचाल आखडत जाते. तोंडात पांढरट चट्टे दिसू लागतात. हा चट्टा बोटाने चाचपता येतो. जीभेवरही पांढरट डाग येतात. जीभ पांढरट गुळगुळीत दिसते.हा आजार हळूहळू काही महिन्यांत वाढतो. दिवसेंदिवस तोंड उघडायला कठीण होऊ लागते. आजार जास्त वाढेपर्यंत त्या व्यक्तीला पुरेसे कळून येत नाही. आणखी एक लक्षण म्हणजे मसाला, तिखट तोंडाला अजिबात लागू देत नाही, खूप झोंबते. या आजारातून पुढे कॅन्सर उद्भवू शकतो.गुटखा विकण्याला महाराष्ट्रात बंदी आहे. काही राजकीय पक्षांनी याबद्दल मोहीम सुरु केली होती. तरीही बेकायदेशीर रित्या गुटखा निरनिराळया नावाने विकला जात आहे. लोकशिक्षण हा यासाठी जास्त चांगला व टिकाऊ उपाय आहे. संपूर्ण भारतातही आता गुटख्याला बंदी लागू झाली आहे. उपचार गुटखा रोगावरचा उपायही बरेच दिवस करावा लागतो.

बीटा-1 कॅरोटीनची रोज एक गोळी याप्रमाणे सहा महिने द्यावी.
काही दंतवैद्य मानवी वारेचे सत्त्व इंजेक्‍शनच्या स्वरूपात डागाखाली टोचतात.
या उपायांबरोबरच आखडलेले तोंड सैल करावे लागते. यासाठी एक गुळगुळीत लाकडी पाचरीसारखी फळी दिवसातून 3-4 वेळा तोंडात 15-20 मिनिटे ठेवावी. रोज थोडी थोडी जास्त पाचर घालावी. यामुळे हळूहळू तोंड सैल होते.

तंबाखू सेवन कसे सोडू शकता?
डॉक्‍टरांच्या सल्ल्‌यानुसार हे व्यसन सोडता येऊ शकते. धूम्रपान करणा-या लोकांपासून दूर राहा. दारूचे व्यसन टाळा. त्यामुळे धूम्रपान करण्याची इच्छा होते. धूम्रपानाची सवय बदला आणि त्या जागी इतर गोष्टींची सवय करून घ्या. शारीरिक व्यायाम, योगा यांसारख्या उपक्रमांत स्वत:ला गुंतवा.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्‍याच्या सूचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.