रांजणगाव गणपती (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट ची दरवर्षी मोठ्या ऊत्साहात भरवण्यात येणारी भाद्रपद महोत्सव यात्रा चालू वर्षी जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार साजरी करता येणार नसल्याचे देवस्थानच्या विश्वस्तांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट हे अष्टविनायकातील महत्वाचे स्थान आहे. अष्टविनायका मधील हे आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक. सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्ह्णून आहे. देवस्थानतर्फे वर्षभरामध्ये विविध उत्सव व पारंपारिक सण साजरे केले जातात त्यामध्ये प्रामुख्याने भाद्रपद गणेशोत्सव यात्रा हा वर्ष भरातील सर्वात मोठा उत्सव असुन यावेळी चार दिवस प्रतिपदा ते चतुर्थी पर्यंत मुक्तव्दार दर्शन म्हणजे प्रत्यक्ष मुर्तीला हात लावुन दर्शन घेता येते व देवाला पाणी घालता येते.
या चार दिवसात महागणपतीच्या चार गावात असणाऱ्या बहिणींना पालखीमधुन आणण्यासाठी पालखीचे मानकरी जातात. पहिल्या दिवशी पुर्वव्दार करडे येथील मांजराई (दोनलाई) देवी तर दुसऱ्या दिवशी दक्षिणव्दार निमगाव म्हाळुंगी येथील आसराई (शिरसाई) देवी तसेच तिसऱ्या दिवशी पश्चिमव्दार गणेगाव येथील ओझराई देवी, चौथ्या दिवशी उत्तरव्दार ढोक सांगवी येथील मुक्ताई देवी अशा चार दिवस चार देवीच्या मंदिरामध्ये पालखी जाते.
भाविकांच्या कुटूंबातील, व्यवसायातील अथवा आयुष्यातील अडचणी, संकटे महागणपतीच्या कृपाप्रसादाने दूर होतात. हे स्वयंभु स्थान असल्यामुळे रांजणगाव येथे कोठेही गणेशमुर्ती बसविली जात नाही. एक गाव एक गणपती हे या ठिकाणी अनेक शतके आहे. महागणपतीच्या चार दिशांना श्री देवीची मंदिरे असुन भाद्रपद उत्सवात या ठिकाणी अनवाणी पायी व्दारयात्रा करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे.
परंतु शासनाने कोरोना महामारीमुळे धार्मिक कार्यक्रम व मंदिर उघडण्यास मनाई केलेली आहे. या पार्श्वभुमीवर विश्वस्त मंडळाने जिल्हाधिकारी पुणे यांना “श्रीं” ची मुक्तव्दार यात्रा करिता परवानगी कामी पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी सो पुणे यांचेकडील दि. १४ ऑगस्ट रोजीचे आदेश क्रं.पगक/कावि/३४०८/२०१८नुसार दिलेल्या आदेशानुसार भाद्रपद व्दारयात्रा हा धार्मिक सोहळा करता येणार नाही.
सबब यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे या वर्षी दि. २० ऑगस्ट २०२० ते दि. २५ ऑगस्ट २०२९ या कालावधीत होणारा भाद्रपद गणेशोत्सव व “श्रीं” ची मुक्तव्दार यात्रा रदद करण्यात आलेली आहे. यामुळे या कालावधीत दर्शन, मुक्तव्दार दर्शन म्हणजे प्रत्यक्ष मुर्तीला हात लावुन दर्शन व देवाला जलाभिषेक बंद असणार आहे. पालखी सोहळा रदद करण्यात आलेला आहे. व्दारयात्रा, भाविकांची दंडवते, कीर्तन, भजन असे कार्यक्रम रदद करण्यात आलेले आहेत.
अशाप्रकारे प्रतिवर्षाप्रमाणे श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे या वर्षी दि. २० ऑगस्ट २०२० ते दि. २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत होणारा भाद्रपद गणेशोत्सव रदद करण्यात आलेला आहे याची सर्व भाविक, भक्तगण, ग्रामस्थ, व्दारकरी, मानकरी, सेवेकरी व इतर सर्वांनी नोंद घ्यावी व श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट ला सहकार्य करावे. असे आवाहन ॲड. विजयराज दरेकर यांनी केले आहे.
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट चे वतीने भाविक, भक्तगण, ग्रामस्थ व अशा अनेक गणेश भक्तांच्या साठी ॲानलाईन दर्शन सुविधा शेमारो भक्ती या ॲपवर महागणपती लाईव्ह दर्शन सेवा यानुसार चालू केलेली आहे. हे ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे असे आवाहन डॅा. संतोष दुंडे यांनी केले आहे. सर्वांनी भाद्रपद गणेशोत्सव कालावधी मध्ये या ॲानलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा व आपले घरी राहूनच श्री महागणपतीची आराधना करावी. आपल्या सह संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना महामारीचे संकटापासून आपण व आपले कुटुंबीय सुरक्षित रहाण्यासाठी घरी रहा व सुरक्षित रहा असे नारायण पाचुंदकर व शेखर देव यांनी सांगितले.