रांची : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून करणाऱ्या सराईत आरोपीला सीबीआय न्यायलयाने फाशीची शिक्षा ठोठावली. विशेष सीबीआय न्यायधिश ए. के. मिश्रा यांनी हा निकाल दिला. यातील दोषी राहुल राज याने अन्य काही मुलींवर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
रांचीच्या बूटी बस्ती भागात 16 डिसेंबर 2016 रोजी एका मुलीचा नग्न मृतदेह सापडला होता. ही मुलगी शिक्षणासाठी एकटीच रहात होती. तिने फोन न उचलल्याने तिच्या बहिणीने शेजाऱ्यांना फोन केला. शेजारी तिला पाहण्यासाठी गेले असता तिचा मृतदेह धुरात पडलेला दिसला. तर घराल आग लागली होती. तिच्या शवविच्छेदनात तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. तिच्या शरीरातून झारखंड पोलिसांनी बलात्काऱ्याच्या डीएनएचे नमुने मिळवले.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनानी रांची ढवळून निघाले. या मुलीचे नाव रांचीची निर्भया असे ठेवले होते. या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची शिफारस राज्य सरकारने तीन जानेवारी 2017ला केली. मात्र तब्बल वर्षभराने केंद्र सरकारने त्याबाबतची अधिसुचना काढल्यानंतर हा गुन्हा 25 जानेवारी 2018 ला सीबीआयने तपासासाठी गेतला. तिच्या घरापासून जवळ राहणारा राज हा घटनेच्या दिवसानंतर गायब असल्याने त्याच्यावर संशय बळावला. त्याला पाटण्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेथे तो तीन वर्ष न्यायलीन कोठडीत होता. त्यानंतर तो जामीनावर सुटला.
त्याच्यावर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 10 गुन्हे दाखल आहेत. तेथून सुटल्यानंतर अटक टाळण्यासाठी तो अनेक युक्त्या वापरत असे. तपास यंत्रणेने नालंदा येथून त्याच्या आई वडीलांचे रक्ताचे नमुने घेतले. हे नमुने या निर्भयाच्या शरीरात मिळालेल्या पुरूषाच्या डिएनएशी तंतोतंत जुळले. त्याल लखनऊतून अटक केली. त्याला रांचीत आणण्यात आले. तेथे त्याच्या रक्ताचे नमुने घेतले. ते मृताच्या शरीरात सापडलेल्या पुरषाच्या डीएनएशी तंतोतंत जुळले.
हा न्यायवैद्यक भक्कम पुरावा घेऊन केंद्रीय अन्वेषण खात्याने 25 ऑक्टोबर रोजी अवघ्या तीन महिन्यात गुन्हा दाखल केला. याची सुनावणी आठ नोव्हेंबरला सुरू करण्यात आली. 16 दिवसांत 30 साक्षिदार तपासण्यात आले. त्याला शनिवारी विशेष न्यायलयाने शिक्षा ठोठावली.