करमाळा – रमाई घरकुल योजने अंतर्गत करमाळा तालुक्यातील अनुसूचित जाती घटकातील वंचित लाभार्थ्यांना 2021 – 22 वर्षात अद्यापपर्यंत लाभ मिळालेला नाही. अशा वंचित नागरिकांना आता रमाई आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. याबाबत भाजपचे तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे यांना प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यास अखेर यश आले आहे.
रमाई योजना चालली पाहिजे, लाभार्थ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे, शासन दरबारी वेळोवेळी लेखी व तोंडी पाठपुरावा करून तात्काळ निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी भाजपचे करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे डिसेंबर 2021 पासून केली होती. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेचे काही पदाधिकारी व प्रतिनिधी देखील उपस्थित होते.तालुक्यातील नागरिकांची घरावाचून होत असलेली ससोहोलपट याबाबत वेळोवेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासोबत सकारात्मक चर्चा देखील केली होती. याबाबत राऊत यांनी आम्ही केलेल्या मागणीची तातडीने दखल घेत जिल्हा प्रकल्प अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून रमाई घरकुल योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.कोरोना कालावधीत रखडलेल्या योजनेचा लाभ आता लाभार्थ्यांना मिळत असल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. तालुक्यातील गोरगरीब नागरिकांच्या घरांचा प्रश्न सरचिटणीस अमरसिंह साळुंके यांच्यामुळे सुटल्याने त्यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.