जामखेड (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जन्मगावी चौंडीतील तीर्थस्थळावर सकाळी भाजपचे माजी मंत्री प्रा राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एकत्र सोबत येऊन शिंदे -पवारांनी आहिल्यादेवींच्या स्मृतिस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या दरम्यान मिळालेल्या वेळेत ‘कुकडी’ च्या आवर्तनाबाबत दोघांमध्ये चर्चा रंगली. विधानसभा निवडणुकीच्या नंतर दुसऱ्यांदा शिंदे व पवार याना एकत्र सोबत पहायला मिळाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती साजरी होत आहे. गेल्या २५ वर्षांपासुन चौंडीत मोठ्या प्रमाणावर जयंती सोहळा साजरा होतो. दरवर्षी ३१ मे रोजी राज्य व देशभरातील कार्यकर्ते, राज्यकर्ते चौंडीत येतात. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जयंती घरीच साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन राम शिंदे यांनी केले होते.आज सकाळी अहिल्यादेवींच्या पुतळ्याला महाभिषेक, पुष्प अर्पण कार्यक्रम झाला. माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार रोहित पवार, अक्षय शिंदे, अविनाश शिंदेंच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कुकडीच्या पाण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक दिवसानंतर शिंदे व पवार आणि त्यांचे कार्यकर्ते एकत्र पहायला मिळाले. दोघेही एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोरोनाच्या काळातही दोघांमधील राजकारण चांगलेच तापले होते. दुसऱ्यांदा चौंडीत माजी मंत्री शिंदे आणि आमदार पवार एकत्र आले.
या पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्याच दिवशी आमदार रोहित पवार यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राम शिंदेंच्या पराभवानंतर त्यांच्या निवास्थानी जाऊन शिंदेंची भेट घेतली होती. शिंदेच्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले होते.आमदार पवारांनी दाखविलेला सुसंस्कृतपणा अनेकांना भावला होता. तसेच माजी मंत्री शिंदेंनी त्यांचा फेटा बांधून केलेला सत्कार पट्टीतील राजकारण्याचे प्रतीक ठरला होता.या प्रसंगी दोघांच्या कार्यकर्त्यांची फौज सोबत होती. आज रविवारी (ता.31) रोजी सकाळी नऊ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दुसऱ्यांदा हा योग येथेच जुळून आला.