आयोध्या : राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्याच्या कामाला सहा महिन्यात सुरवात करण्यात येईल, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपला दास यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभारलेल्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी दास यांची निवड करण्यात आली. त्यानंतर प्रथमच ते माध्यमांशी बोलत होते. आयोध्येत येत्या 3 आणि 4 तारखेला ट्रस्टच्या विश्वस्तांची बैठक होणार आहे. त्यात मंदिराचा बांधकाम व्यावसायिक आणि काम सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात येईल.
अन्य एक विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय तृतीया म्हणजे २६ एप्रिलला या कामाची सुरवात करण्यात येईल. मंदिर उभारणीच्या कामाचे कंत्राट मिळवण्यासाठी लार्सन अँड टुब्रोसह अनेक कंपन्या इच्छूक आहेत. राम नवमीला काम सुरू करण्याची कल्पना विश्वस्तांच्या पहिल्या बैठकीत फेटाळण्यात आली. रामनवमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यादिवशी मंदिर निर्माणाची सुरवात केली तर जिल्हा प्रशासनावर मोठा ताण येऊ शकतो. त्यामुळे ही तीथी टाळण्यात आली. रामनवमीनंतर मंदिर उभारणी कधी सुरू होते या क्षणाची रामभक्त आतुरतेने वाट पहात आहेत, असे मत विश्व हिंदु परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी व्यक्त केले.