राजगुरुनगर – महाशिवरात्री निमिताने राजगुरुनगर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. करोनाचे संकट सरल्यानंतर 2 वर्षांनी आज महाशिवरात्री निमित्ताने येथील यात्रेत स्थानिक व परिसरातील गावातील नागरिक कुटुंबासह दर्शनासाठी आले होते.
खेड तालुक्यात असलेले ज्योतिर्लिंग भीमाशंकर, भोरगिरी येथील कोटेश्वर, गुंडाळवाडी येथील शंभू मंदिर, राजगुरुनगर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर, चाकण येथील श्री चक्रेश्वर मंदिर, वेताळे येथील सिद्धेश्वर मंदिर, चास येथील श्री सोमेश्वर मंदिर, वाकळवाडी येथील श्री वाळकेश्वर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने भाविक दरवर्षी दर्शनासाठी गर्दी जातात. गेली दोन वर्षे करोना विषाणू महामारी असल्याने मंदिरे काही काळ बंद होती. लॉकडाऊन असल्याने भाविक नागरिकांना देवदर्शन करता आले नाही. यावर्षी मात्र करोनाचे संकट कमी झाल्याने मंदिरे खुली झाली तर नागरिकांनाही तेथे जाण्याचे निर्बंध उठवल्याने महाशिवरात्रीनिमित्ताने मंदिरे भाविक भक्त व नागरिकांनी गजबजली आहेत.
ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे यावर्षी भाविकांची मोठी संख्या होती तर कोटेश्वर (भोरगिरी), श्री शंभू (बुरसेवाडी) राजगुरुनगर, चाकण, चास येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. हर हर महादेव, ओम नमो शिवाय च्या जयघोषात तालुका आज न्हावून निघाला. राजगुरुनगर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात आज (दि 1) रोजी महाशिवरात्री निमित्ताने राजगुरुनगर आणि परिसरातील भाविकांनी सकाळी पासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सर्वांना दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थान ट्रस्टच्यावतीने नागरिकांना खास सोय करण्यात आली होती. दर्शनसाठी मंदिराच्या बाहेर कुटुंबासोबत आलेल्या भक्तगणांचा लांबच लांब रांगा लावल्या होत्या. यात लहान मुले व महिलांची संख्या लक्षणीय होती. बच्चे मंडळीना खेळण्यासाठी उंच पाळणे, छोटी रेल्वे, घोडागाडी, उड्या मारण्याची स्प्रिंग सह विविध मुलांसाठी खेळण्याची दुकाने व महिलांच्या दैनदिन गरजेच्या वस्तूंची दुकाने थाटली होती. या दुकानात दर्शनानंतर खरेदीसाठी गर्दी केली होती.