Rajasthan Election Result 2023 राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. राज्यातील 199 पैकी 100 हून अधिक जागांवर भाजप आघाडीवर आहे. दरम्यान, राज्यात सर्वात चर्चेचा ठरत असलेल्या शिव विधानसभेच्या जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून लढत असलेल्या विद्यार्थी नेते रवींद्रसिंग भाटी हे सर्वच दिग्गज नेत्यांहुन वरचढ ठरताना दिसत आहेत. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेस, भाजप आणि आरएलपी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानासाठी लढत आहेत.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सध्या रवींद्र सिंह भाटी 16,863 मतांनी आघाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार फतेह खान ९३२२ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसचे उमेदवार अमीन खान ६६३४ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
आरएलपीचे उमेदवार जालम सिंह 3258 मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत आणि भाजपचे उमेदवार स्वरूप सिंह खारा 2448 मतांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, समोर आलेल्या आकडेवारीनुसार, अपक्ष उमेदवार रवींद्र सिंह भाटी हेराज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनाही भारी पडताना दिसून येत आहेत.
कोण आहेत रवींद्र सिंह भाटी?
रवींद्र सिंग भाटी हे तरुण विद्यार्थी नेते म्हणून ओळखले जातात. जोधपूर विद्यापीठाचे ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहिले आहेत. या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आत्तापर्यंत मिळालेल्या मतांवरून असा संदेश मिळत आहे की, शिव मतदारसंघांतील भाजपचे संपूर्ण मत रवींद्रसिंग भाटी यांच्याकडे वळले आहे, तर मुस्लिम मते अमीन खान आणि फतेह खान यांच्यात विभागली जात आहेत.