Chhattisgarh Assembly Election Result 2023 Live Updates : छत्तीसगड येथे कॉंग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालात थेट लढत रंगत आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेस या मुख्य पक्षात रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडनुसार भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होताना दिसत आहे. वृत्त लिहेपर्यंत भाजप पक्ष 53 जागांवर पुढे होता. तर काँग्रेस 35 आणि इतर 2 जागांवर पुढे आहे. (ही आकडेवारी निवडणूक निकाल नसून सुरुवातीचे कल आहेत) सध्या ट्रेंडनुसार अस दिसतय की, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. या सर्व परिस्थितीमध्ये असा प्रश्न उपस्थित होत आहे की, राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्री कोण होणार?
राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी या प्रकरणी स्पष्टपणे सांगितले आहे की, निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली नाही तर सामूहिक नेतृत्वाखाली लढली गेली आहे. अशा स्थितीत रमण सिंह यांनीच या शर्यतीतून माघार घेतल्याचे मानले जात आहे.
माजी मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेने पंतप्रधान मोदींच्या हमींवर विश्वास ठेवला आणि भूपेश बघेल यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला नाही. पहिल्या टप्प्यातील ट्रेंडमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते. भाजपला राष्ट्रीय नेतृत्वाचा आशीर्वाद नक्कीच लाभला आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसारही bjp आघाडीवर दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार भाजप 53 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 1 आणि सीपीआय 1 जागेवर आघाडीवर दिसत आहे. आतापर्यंत एकूण 90 जागांचे ट्रेंड आले आहेत.