मुंबई – मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तसेच मराठी भाषेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच आग्रही राहिले आहेत. स्थानिक भूमिपुत्रांचा विषय असो वा महाराष्ट्राचे नवनिर्माण करणे असो राज ठाकरे यांनी अनेकदा सर्व सामान्य जनतेला जागे करण्याचे काम केले आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून एक खास पोस्ट केली आहे.
‘मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी सरकारने सुरुवात केली होती परंतु तितक्या उत्सहात तो दिवस साजरा होत नसल्याची खंत यावेळी ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. तसेच सध्याची राजकीय दंगल पाहता मराठी भाषेसाठी उभे राहावे लागणार असल्याचे ठाकरेंनी म्हंटले आहे.
काय म्हणालेत राज ठाकरे नेमकं आपल्या पोस्टमध्ये
“सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा ! कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला अभिवादन म्हणून तेंव्हाच्या सरकारने, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी, ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला. पण नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली”. असं राज ठाकरे यावेळी म्हणतात.
“मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पक्ष पण आमचाच पहिला. हे सगळं सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरहिरीने पुढे आलेला नाही. आणि सध्या जी एकूणच जी राजकीय दंगल सुरु आहे, त्यात कोणी येईल अशी शक्यता वाटत नाही”.
असो, त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्या लाडक्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना, ह्या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभं रहावं लागणार आहे हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी, प्रशासनात मराठी, दूरसंचार माध्यमांमध्ये मराठी, दूरदर्शनच्या समालोचनात मराठी इथपासून ते अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला, आणि पुढे देखील करू. पण त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी तरच हे शक्य आहे.
‘… मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !’ #मराठीराजभाषादिन #MarathiRajbhashaDin pic.twitter.com/a82MFIyveS
— Raj Thackeray (@RajThackeray) February 27, 2023
“मला माहिती आहे, मनसेकडूनच तुमच्या सगळ्या बाबतीत अपेक्षा असतात, पण ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीची गरज आहे. आपण ‘मराठी एकत्र’ असू तर ‘सर्वत्र मराठी’ करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही. मी माझ्या विकास आराखड्यात म्हणलं आहे तसं, मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा”