184 जणांना अटक, 600 जणांची चौकशी सुरू
अंकारा : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुर्कीला बसलेल्या विनाशकारी भूकंपाच्या धक्क्यानंतर आता देश काही प्रमाणात सावरत असून प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. भूकंपात झालेल्या नुकसानीला जबाबदार असल्याचा संशयावरून 184 जणांना अटक करण्यात आली असून 600 पेक्षा जास्त जणांची चौकशी करण्यात येत आहे.
या विनाशकारी भूकंपामध्ये पन्नास हजार पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असून तुर्कस्तानच्या विविध शहरातील 16000 पेक्षा जास्त इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या इमारतींच्या बांधकामाची जबाबदारी असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या इमारती उभारताना योग्य काळजी घेण्यात आली नाही आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञान व्यवस्थितपणे अंमलात आले नाही.
या कलमाखाली चौकशी करून कारवाईला प्रारंभ करण्यात आला आहे या भूकंपामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राणहानी आणि वित्तहानी झाली असल्याने त्याची चौकशी करण्यात येत असून चुकीच्या पद्धतीने इमारतींची उभारणी केल्याने त्याचा फटका तुर्कीला बसल्याचा निष्कर्ष तज्ञांनी काढला आहे. म्हणून या चुकीच्या इमारतींची उभारणी केलेल्या लोकांवर आता ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर राष्ट्रपती येरदोगन यांना याची दखल घ्यावी लागली आणि ज्या इमारतींचे नुकसान झाले आहे. त्या इमारतींच्या उभारणीसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याप्रमाणे आत्तापर्यंत 184 जणांना अटक करण्यात आली आहे .113 जणांवर अटकेची टांगती तलवार असून 600 पेक्षा जास्त बिल्डर आणि व्यावसायिक यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.