Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा पावसाने धुमाकुळ घातला आहे. मिचाँग चक्रीवादळातून तामिळनाडूमधील नागरिक आता कुठे सावरत असताना पावसामुळे येथील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. अनेक ठिकाणी रस्ते आणि लोकांच्या घरातही पाणी तुंबलेले दिसले.
तमिळनाडूच्या थुथुकुडी, तिरुनेलवेली, टेंकासी, कन्याकुमारी आणि रामनाथपुरमसह दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तमिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवर आणि मन्नारच्या आखातावर चक्रीवादळ वाऱ्यांचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. तुतीकोरीनमधील तिरुचेंदूरमध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत अवघ्या १५ तासांत ६० सेमी पाऊस झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधूनही पाणी सोडण्यात आले असून, त्यामुळे अनेक भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे.
#WATCH | Tirunelveli, Tamil Nadu: Streets in the residential area of Selvi Nagar, Sindupoondurai inundated due to incessant rainfall. pic.twitter.com/sUI0eVzwOc
— ANI (@ANI) December 18, 2023
यासंबंधीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. दरम्यान, धरणांमधून पाणी सोडण्याबाबत आणि जनजीवनाची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे तामिळनाडू सरकारने १८ डिसेंबर रोजी तिरुनेलवेली, थुथुकुडी, कन्याकुमारी आणि तेनकासी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, खाजगी संस्था, बँका आणि वित्तीय संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
१९ डिसेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि रामनाथपुरम जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. १९ डिसेंबर रोजी तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये वादळसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मच्छिमारांनीही समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील सात दिवस तामिळनाडूच्या अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.