कुरकुंभ -हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दौंड तालुक्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास कुरकुंभ परिसरात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. सुमारे एक तास सुरू असलेल्या पावसामुळे कुरकुंभ परिसर आणि पुणे-सोलापूर महामार्गवरील सेवा रस्त्यावर अक्षरशः पाण्याचे तळे साचले होते.
सकाळ पासूनच वातावरणात बदल होत होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण ढगाळ होते. सायंकाळी जोरदार सरींना सुरवात झाली. पावसाने सुरवातीला चांगलाच जोर धरला होता; मात्र नंतर काही वेळ नुसतीच भुर-भुर पाहायला मिळाली.
एक तासाहून अधिक वेळ झालेल्या पावसामुळे कुरकुंभ हद्दीतील महामार्गावरील सेवा रस्ते जलयमय दिसत होते. या पावसामुळे परिसरात चांगलाच गारवा निर्माण झालाय. या झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला गेला हे मात्र नक्की.