पुणे – मागील दोन दिवसांपासून शहरात पावसाची रिपरिप होत आहे. त्यामुळे नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागानेदेखील पुढील दोन दिवसांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुण्यातदेखील शनिवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पूर्व मध्य अरबी समुद्र-कर्नाटक किनारपट्टीलगत ते लक्षद्वीपवर असलेला कमी दाबाचा पट्टा आता कायम आहे. मागील 24 तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
पुणे शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये 11 जुलै रोजी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता विभागाने वर्तविली आहे. शुक्रवारी शहराच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण होते. यासह कमाल 31 अंश सेल्सिअस आणि किमान 22 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 1 जूनपासून आतापर्यंत पुणे येथे 258.9 मिमी, लोहगाव येथे 312.1 मिमी, पाषाण येथे 201.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.