शिरूर -शिरूर शहरातील कोविड केअर सेंटर येथून करोना तपासणीसाठी पाठवलेल्या 26 जणांपैकी एकाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शिरूर तालुक्यात आज नव्याने आणखी चार असे मिळून 5 करोना पॉझिटिव रुग्ण असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिरूर तालुक्यात करोना बाधितांचे आकडा आता 129 एवढा झाला आहे.
शिरूर शहरातील संभाजीनगर हुडको वसाहत येथे 53 वर्षीय पुरुषाला करोनाची बाधा झाली असून, त्याच्या संपर्कात आलेले सोनार आळी येथील 13, तर हुडको वसाहत येथील 44 असे एकूण 57 जण होम क्वारंटाईन करण्यात आली असल्याची माहिती ती दूर नगरपालिका मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. हुडको वसाहतीतील लेन नंबर 3 कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यात आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुका आता करोना संसर्गाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, सतत हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, तोंडाला सतत हात लावू नये, बाहेर गेल्यावर कुठल्याही वस्तूला हात लावू नये, सोशल डिस्टन्स पाळावे यांसह शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व शिरूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.