परभणी : शहरातील उड्डाणपुलावर दुचाकीच्या अपघातात भाजपचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नेमका हा अपघात कसा झाला याची कुणालाही कल्पना नाही. मात्र, दुचाकीचा चकानाचूर झाल्याचे पाहून भीषण अपघात झाला असल्याचे स्पष्ट होत आहे.
माजी आमदार मोहन फड यांचा लहान मुलगा पृथ्वीराज फड हा मुंबईत शिकतो. लॉकडाऊनमुळे मागच्या काही दिवसांपासून तो परभणीत होता. शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास पृथ्वीराज हा त्याची डुक्याटी या मोटारसायकल वरून गंगाखेड रस्त्याकडे जात असताना उड्डाणपुलावर त्याचा अपघात झाला, त्यात तो गंभीर जखमी झाला होता. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, उपचार पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली व फड कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात पोचले असुन त्यांच्यावर या अपघाताने मोठा आघात झाला आहे.