हिंसाचाराचे लोण प. बंगालमध्ये

रेल्वे संकूल पेटवले
अमित शहांचा ईशान्य दौरा रद्द
शिजो ऍम्बे -मोदी भेट रद्द
शिलॉंग, असामात काही काल संचारबंदी शिथिल

कोलकाता : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात प. बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका उडाला असून मुर्शिदाबाद जिल्ह्यात बेलडांगा रेल्वेस्थानक निदर्शकांनी पेटवून दिले. त्याचवेळी त्याला विरोध करणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. हावडा जिल्ह्यातही रेल्वे मार्गावर अडथळे उभारून रेल्वे सेवा थोपवून धरली. दरम्यान, या कायद्याच्या अंमलबजावणी राज्यात कोणत्याही परिस्थितीत होणार नसल्याचे सांगत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कायद्याविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असल्याचे अदेश दिले. शिलॉंग आणि गुवाहाटीमधील संचारबंदी काही काळासाठी शिथिल करण्यात आली होती. त्यावेळी नागरिकांनी जीवनावश्‍यक सामान भरून ठेवण्यासाठी दुकानांच्या बाहेर रांगा लावल्याचे चित्र पहायला मिळाले. हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी आपला शिलॉंग दौरा रद्द केला. तर जपानचे पंतप्रधान शिजो ऍबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिखर परिषद रद्द करण्यात आली. दिल्लीत जामिया मिलीया उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला यात सुमारे 50 विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

बेलडांगा रेल्वे संकूल निदर्शकांनी पेटवले
रेल्वे संकूलाजवळ अचानक निदर्शकांचा मोठा जमाव जमला. त्यांनी प्लॅटफॉर्म आणि आवारातील तीम इमारती पेटवून दिल्या. त्यांना रोखण्याचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी केला. त्यावेळी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान या मारहाणीत जखमी झालेल्या काही कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. येथील रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे, असे रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सीलदाहमध्ये रेल्वे रोखली
पूर्व रेल्वेच्या सीलदाह विभागात रेल्वेसेवा पूर्णपणे बंद पाडण्यात आली. त्यामुळे शेकडो प्रवासी अडकून पडले. बेलडांगा आणि राजीनगर स्थानकांत त्यांनी रेल्वे मार्ग उखडल्याने रेल्वेसेवा खंडित झाली. बरूईपूर अणि डायमंड विभागातही रेल्वे सेवा रोखून धरल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला.

रेल्वेरुळांवर टायर्स पेटवण्यात आली.
रेल्वेरुळांवर टायर्स पेटवण्यात आली.

हावडा विभागात रेल्वे स्थानकाची नासधूस
निदर्शकांनी प. बंगालमध्ये हावडा जिल्ह्यातील उलूबेरीया रेल्वे स्थानकाची नासधूस केली. काही रेल्वे गाड्यांचे नुकसान केले. निदर्शकांच्या दगडफेकीत रेल्वेचा एक चालक जखमी झाला. हा गोंधळ दुपारी तीन वाजून 22 मिनिटांनी सुरू झाला. त्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही रेल्वे सेवांवर त्याचा परिणाम झाला. हावडा चेन्नई कोरोमंडल एक्‍सप्रेसवर निदर्शकांनी तुफानी दगडफेक केली. त्यात त्याचा चालक जखमी झाला.

या स्थानकावरील प्लॅटफॉर्मही उद्‌ध्वस्त करण्यात आले. हमसफर एक्‍सप्रेसच्या रिकाम्या बोगीचीही नासधूस करण्यात आली. या घटनांत अद्याप कोणी प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारकडे मदत मागितली आहे, असे दक्षिण पूर्व रेल्वेचे प्रवक्ते संजय घोष यांनी स्पष्ट केले.

रेल्वे स्थानकाची केलेली जाळपॊळ

हावडा खरगपूर रेल्वे मार्ग रोखून धरला. रेल्वेमार्गावर ठिकठिकाणी अडथळे उभारण्यात आले. त्यामुळे अनेक लांब पल्ल्यांच्या रेल्वे आणि उपनगरीय रेल्वेसेवा खोळंबली. दरम्यान निदर्शकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा रोखून धरला.

संचारबंदी शिथिल
मेघालयची राजधानी असणाऱ्या शिलॉंगमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंसदी सकाळी दहा वाजता 12 तासांसाठी शिथिल करण्यता आली. आसामच्या काही भागातलि संचारबंदी सकाळी सहा ते एक यावेळेत शिथिलल करण्यात आली. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले. बुधवारी रात्री नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यामुळे येथे राजकीय हिंसाचार उफाळल्यानंतर येथे संचारबंदी जारी करण्यात आली होती. या भागात लष्कराच्या 20 कंपनी तैनात करण्यात आल्या आहेत.

सदर आणि लुंडायनगिरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आल्याचे पूर्व खासी पर्वतीय जिल्ह्याचे उपायुक्त एम. एन. नॉनब्री यांनी सांगितले. गुरूवारनंतर संचारबंदी असतानानाही अनुचित घटना घडल्या होत्या. त्यामुळे अजून येथे इंटरनेट सेवा खंडित ठेवण्यात आली आहे.

दिब्रुगढ आणि आसाममध्ये नागरिकांनी संचारबंदी शिथिल होताच दुकानांकडे धाव घेतली. त्यांनी जीवनावश्‍यक सामान भरून ठेवले. त्यामुळे हे आंदोलन लवकर शमण्याची चिन्हे नसल्याचे मानण्यात येत आहे.

राज्यभर निदर्शने करणार : ममता

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी

हे भगवे सरकार आमच्यावर हा कायदा लादू शकत नाही. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (कॅब) संसदेत मंजूर केला तरी आम्ही राज्यात लागू करू देणार नाही. आमच्यावर भाजपा तो लादू शकत नाही, असे ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

या कायद्याच्या विरोधात राज्यभर निदर्शने करण्यात येणार असून त्यासाठी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नियोजित दिल्ली दौरा रद्द केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नगरिकत्व कायद्यामुळे भारतात फूट पडेल, अशी भीती व्यक्त करत त्या म्हणाल्या, जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत तोपर्यंत या देशातून कोणालाही बाहेर काढले जाणार नाही. जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी त्यांची नियोजित शिखर परिषद या आंदोलनामुळे पुढे ढकलली हे देशासाठी लांच्छनास्पद आहे, असेही त्या म्हणाल्या

अमति शहा यांचा शिलॉंग, अरूणाचलचा दौरा रद्द
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी शिलॉंगला भेट देणार होते. तेथील ईशान्य पोलिस अकादमीची ते पाहणी करणार होते. मात्र ईशान्य भारतात कॅबविरोधात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही भेट रद्द केली आहे. झारखंड निवडणुकांनंतर ते तेथे भेट देतील, असे गृहमंत्रालयाच्या सुत्रांनी स्पष्ट केले.

जपानच्या पंतप्रधानांचा दौरा स्थगित

शिंजो अबे आणि मोदी
शिंजो अबे आणि मोदी

नागरीकत्व सुधारणा विधेयकामुळे आसाम आणि ईशान्य भारतातील अन्य राज्यांमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारामुळे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांचा भारत दौरा स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या संमतीने त्यांच्या दौऱ्याची नवीन तारीख लवकरच निश्‍चीत केली जाईल अशी माहिती भारताच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी आज दिली. या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर बांगलादेशचे गृहमंत्री एके अब्दुल मोमेन यांचाही भारत दौरा या आधी रद्द करण्यात आला आहे.
शिंजो अबे आणि मोदी यांच्यात गुवाहाटी येथे 15 डिसेंबर पासून 17 डिसेंबर या अवधीत चर्चा होणार होती. पण तेथे सध्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. गुवाहाटी मध्ये या दौऱ्यानिमीत्त जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांची पोस्टर्सही लावण्यात आली होती. ती पोस्टर्सही निदर्शकांनी फाडून टाकण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे एकूणच वातावरण पाहून हा दौरा लांबणीवर टाकण्याची सुचना जपानकडून भारताला करण्यात आली होती. त्यानुसार दोन्ही देशांनी ही भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशाचे गृहमंत्री आज मेघालयात भेट देणार होते. तो कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.