रायगड – मण्यार जातीच्या विषारी सापाच्या दंशाने 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पेण तालुक्यातील जिते गावात घडली आहे. सारा ठाकूर असे मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच साराला रुग्णालयात नेण्यात आले मात्र योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरेप कुटुंबियांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साराला मंगळवारी रात्री मण्यार जातीच्या सापाने दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच तीला उपचारासाठी पेण येथिल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याठिकाणी योग्य उपचार न झाल्याने साराला पेण येथील खासगी रुग्णालयात नेते मात्र तेथील डाॅक्टरांनी उपचार करण्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर तीला अलिबाग जिल्हा रुग्णालयात व नंतर कळंबोली येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली आहे. सारा हिच्या मृत्यूने जिते गावावर शोककळा पसरली आहे.
साराच्या मृत्यूसाठी आरोग्य विभागाचे प्रशासनच दोषी आहे. त्यांच्यामुळेच आम्ही आमची सारा गमावली, असा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला आहे.
दरम्यान, पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या डाॅ. रजपूत मॅडम यांनी सांगितले की, जिते गावातील सर्पदंशाची रुग्ण सारा रमेश ठाकूर हिला उपचारासाठी रात्री दोनच्या सुमारास दाखल करण्यात आले. तिच्यावर विषाची मात्रा कमी करण्यासाठी योग्य ते उपचार करण्यात आले आहेत. तिला ज्यावेळी रुग्णालयात आणण्यात आले तेव्हाच ती गंभीर अवस्थेत होती. सतत उलट्या होत होत्या. अशा परिस्थितीत आयसीयू रूम नसल्याने आम्ही तिला अधिक उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते.