पुणे – पुणे शहरातील आमदार अनिल भोसले यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. यामध्ये त्यांच्या दोन महागड्या गाड्या आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले आहेत. या गुन्हयात त्यांना अटकही करण्यात आली होती. पोलिस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांनी जामिनासाठी दोन वेळा अर्ज केला होता. मात्र तो फेटाळ्यात आला.
सहकारी बॅंकेतील घोटाळ्यासंदर्भात भोसलेंवर कायदेशीर कारवाई झाली आहे. त्यांच्यावर तब्बल 72 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. सहकार कायद्यातील तरतुदींनुसार नुकसानीस जबाबदार असलेल्यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. या बॅंकेचे रिझर्व्ह बॅंकेने 2018-19 चे ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. त्यात 71 कोटी 78 लाख रुपये कमी आढळले होते. त्यानंतर या बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ही कारवाई मागील दोन आठवड्यांपासून सुरु आहे. भोसले यांची लॅण्ड क्रुझर, टोयाटा कॅमरी आणी मारुती बलेनो या गाड्या जप्त केल्या गेल्या आहेत. यांची किंमत सव्वा कोटीच्या आसपास आहे. त्यांच्या मालकीच्या आणखी दहा ते बारा गाड्यांवरही जप्ती आणण्याची तयारी सुरु आहे. लॉकडाऊनपुर्वी भोसले आणी त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे इतर कार्यवाहीस थोडा विलंब झाला होता. या गुन्हयासंदर्भात एमपीआयडी न्यायालयात दोषारोपपत्रही मे महिण्यात सादर झाले आहे.