मराठा समाजा नंतर आता धनगर समाजाची कोल्हापूरात गोलमेज परिषद

2 ऑक्टोबरला धनगर समाजाची कोल्हापूरात गोलमेज परिषद

कोल्हापूर (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या गोलमेज परिषदे पाठोपाठ कोल्हापूरात धनगर समाजाने गोलमेज परिषदेचे आयोजन केले. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर आरक्षणाचे जनक राजर्षी, छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्मभूमीत 2 ऑक्टोंबर रोजी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना साक्षी ठेवून ही परिषद होणार आहे. आणि या परिषदेतच केंद्र आणि राज्य सरकार विरोधात धनगर आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करून आंदोलनाचे नव्याने रणसिंग फुंकले जाणार असल्याची माहिती, धनगर आरक्षण समन्वय समितीचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, धनगर जमातीचा एकही खासदार सध्या लोकसभेत नाही. त्यामुळे धनगर आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत कोणीही उपस्थित करत नाही. परिणामी घटनेत करावी लागणारी दुरुस्ती आणि कायद्यातील त्रुटी दूर करण्याबाबत कांहीही होत नाही आणि त्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच आता याप्रकरणी स्वतःहून पुढाकार घ्यावा, लोकसभेत चर्चा करावी आणि धनगर आरक्षणावर देशातील सर्व राजकीय पक्षांचे एकमत घडवून आणावे.

तसेच राज्य सरकारची मदत घेऊन सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या बाजूने भूमिका घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने आपण धनगर समाजाबरोबर आहोत व सामाजिक न्यायाच्या बाजूने आहोत हे कृतीतून सिद्ध करावे असेही त्यांनी म्हंटले आहे. त्यामुळे आता २ ऑक्टोंबरच्या धनगर समाजाच्या गोलमेज परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या परिषदेसाठी धनगर समाजाचे सर्व आजी, माजी आमदार, खासदार व सर्व संघटनांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतनिधीही उपस्थित राहणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.