आक्षेपार्ह जाहिरात : जादुटोणा कायद्यांतर्गत सव्वादोन लाखांचा औषधांचा साठा जप्त
पुणे – आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनातर्फे 16 ते 18 डिसेंबरदरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यात एका कंपनीच्या औषधाच्या लेबलवर आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने एकूण 2,18,866 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई औषधे आणि जादुटोणा उपाय कायदा 1954 अंतर्गत करण्यात आली आहे. तसेच अशा औषधांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या उत्पादक आणि वितरक यांच्यावर छापे टाकण्यात आले आहेत.
“अस्थामिन सिरप’ असे त्याचे नाव असून, हरियाणाच्या गुडगावमधील “लॉर्डस होमिओपथिक लॅब’ यांचे ते प्रॉडक्ट आहे. बाजीराव रस्त्यावरील मे. कुंदन होमिओ डिस्ट्रीब्युटर्स यांच्याकडून या कंपनीची 1 लाख 29 हजार 420 रुपयांच औषधांचा साठा जप्त करण्यात आला. कफ, अस्थमासंदर्भात या औषधावर आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. औषध निरीक्षक शामल महिंद्रकर, सु. ता. सावंत यांनी ही कारवाई केली.
डेहराडून येथील “स्टीमुलन्ट एच ड्रॉप’ उत्पादक व्हीझल होमिओ फार्मा या औषधाच्या लेबलवरही आक्षेपार्ह मजकूर आढळला. त्याचाही 16 हजार 740 किंमतीचा साठा चिंचवड येथील मे. कौशल डिस्ट्रीब्युटर्स यांच्याकडून हस्तगत करण्यात आला. औषध निरीक्षक म. ब. कवटिकवार, भाग्यश्री यादव, श्रुतिका जाधव यांनी ही कारवाई केली. याशिवाय उत्तर प्रदेशातील बरेली येथील “डॉ. एम. एस. बासू इस्टाईन आय ड्रॉप’ उत्पादक जगत फार्मा या औषधाच्या लेबलवर “कॅट्रॅक’ आणि “ग्लॅकोमा’ असा आक्षेपार्ह मजकूर आढळला. सदाशिव पेठेतील मे. डी. के. एन्टरप्रायजेस कडील या औषधांचा 38 हजार 581 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. औषध निरीक्षक वि. वि. नागरे, म. ब. कवटीकवार यांनी हे कारवाई केली.
भिवंडीतही कारवाई
भिवंडीतील रामपूर भागातील “पीडीपी स्लीम ड्रॉप’ उत्पादक असलेल्या मे. पाठक ड्रग अँड फार्मास्युटिकल्स यांच्या औषधावरही आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने 34 हजार 125 किंमतीचा साठा साताऱ्यातील भवानीपेठेतील मे. एस. डी. आर. एम. हिलींग आर्टस प्रा. लि. या दुकानातून जप्त करण्यात आला. औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी ही कारवाई केली. अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस. बी. पाटील, जवंजाळ पाटील, डी. एम. खिंवसरा, एस. व्ही. प्रतापवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.