नवी दिल्ली – जगभरातील नागरिकांना विशेषत: युवकांना अमेरिका, कॅनडा या देशांचे आकर्षण असते. मात्र गेल्या दोन तीन वर्षांपासून किमान कॅनडाच्या बाबतीत वेगळेच चित्र समोर येते आहे. ते म्हणजे कॅनडात आलेले व तेथे राहणारे लोक पुन्हा आपल्या मायदेशी परतत आहेत किंवा राहण्यासाठी अन्य देशांची निवड करत आहेत. त्या देशाच्या एका संस्थेने केलेल्या अहवालातच ही माहिती समोर आली आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ कॅनडीयन सिटिझनशीप आणि कॉन्फरन्स बोर्ड ऑफ कॅनडाने हा अभ्यास केला आहे. त्यानुसार 2019 या वर्षात बाहेरून आलेल्या मात्र कॅनडा सोडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कॅनडाचे कायम नागरिकत्व ज्यांना प्राप्त झाले आहे त्यांचेही देश सोडणाऱ्यांतील प्रमाण अगोदर 0.9 टक्के होते. ते प्रमाणही 2019 मध्ये 1.18 टक्के झाले आहे.
एकूण संख्येत सांगायचे झाले तर 2019 या एका वर्षात कॅनडा सोडून दुसऱ्या देशात जाणाऱ्यांची किंवा आपल्या मूळ देशात परतणाऱ्यांची संख्या 67 हजार इतकी आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कॅनडा सरकारला अपयश आल्यामुळे हे प्रमाण वाढत चालले असल्याच्या निष्कर्षही अभ्यासात नोंदवण्यात आला आहे. कॅनडात दाखल झालेल्या मात्र नंतर अपेक्षाभंग झालेल्या या लोकांच्या देश सोडण्याच्या कृतीमुळे कॅनडाच्या विकासाला कसा फटका बसू शकतो याचीही माहिती अहवालात देण्यात आली आहे.
अभ्यास अहवालात देशातील जस्टीन ट्रुडो सरकारच्या संदर्भातही भाष्य करण्यात आले आहे. सरकारच्या धोरणांमुळे वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक असलेल्या घरांच्या समस्येत वाढच झाली आहे तसेच पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधांची स्थिती खराब झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ कॅनडीयन सिटिझनशीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल बर्नहार्ड म्हणाले की लोकांचा कॅनडात राहण्याचा उत्साह कमी होतो आहे. त्यामुळे नवीन लोकांनी येथे येण्यावरही त्याचा परिणाम झाला आहे. कॅनडाचा नागरिक होण्याचा पर्याय निवडणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. जर कॅनडा या गोष्टी ठिकठाक करू शकला नाही आणि महत्वपूर्ण सेवा आणि शक्ती प्रदान करू शकला नाही तर लोक येथून निघून जातील.