मुंबई – कर्णधार केएल राहुलने केलेल्या नाबाद 103 धावांच्या मदतीने लखनौ सुपर जायन्ट्सने मुंबई इंडियन्सला 18 धावांनी पराभूत करत स्पर्धेत विजयाचा चौकार ठोकला. दुसरीकडे बलाढ्य मुंबईला सलग सहावा पराभव पत्करावा लागला. यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाला स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवणे खूपच कठीण जाणार आहे. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी लखनौसाठी अर्धशतकी सलामी दिली. फिरकीपटू फॅबियन ऍलनने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्याने डी कॉकला (24) पायचीत पकडले. त्यानंतर आलेल्या मनीष पांडेनेही (38) राहुलसोबत अर्धशतकी भागीदारी उभारली. चांगल्या लयीत खेळणाऱ्या राहुलने 12व्या षटकात आपले अर्धशतक फलकावर लावले. मुरुगन अश्विनने मनीषची दांडी गुल केल्यानंतर मार्कस स्टॉइनिसही (10) लवकर तंबूत परतला.
राहुलने 19व्या षटकात टायमल मिल्सला चौकार ठोकत आपले शतक साजरे केले. 100व्या आयपीएल सामन्यात शतक ठोकणारा केएल राहुल पहिला फलंदाज ठरला. यासह लखनौने 20 षटकात 4 बाद 199 धावांचा डोंगर उभारला. राहुलने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 103 धावांची निर्णायक खेळी केली. या हंगामात शतक ठोकणारा केएल राहुल दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने शतक झळकावले होते.
निर्धारित धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन पुन्हा एकदा अपयशी ठरले. रोहित 6 धावांवर, तर इशान किशन 13 धावांवर बाद झाले. डिवाल्ड ब्रेव्हिसनेपुन्हा एकदा त्याच्या बॅटिंगची चुणूक दाखवली, पण त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. 13 चेंडूत 31 धावा करून ब्रेविस बाद झाला. 238.46च्या स्ट्राईक रेटने ब्रेविसने 6 चौकार आणि 1 षटकार खेचला. आवेश खानने ब्रेव्हिसला बाद करत मोठा अडथळा दुर केला.
यानंतर सुर्यकुमार यादव (37), तिलक वर्मा (26) आणि कायरान पोलार्ड (25) यांची खेळी अपुरी ठरली. लखनौकडून आवेश खानने 3 विकेट घेतल्या. तर होल्डर, चमीरा, बिष्णोई आणि स्टॉयनिस यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेत सुरेख साथ दिली.
सारा ठरली चाहत्यांचे आकर्षण
या सामन्यातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरला आयपीएल पदार्पण करण्याची संधी मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु तसे घडले नाही. मात्र या सामन्यासाठी तेंडूलकर कुंटुंब सहपरिवार उपस्थित होते. सचिन हा मुंबई संघाचा मार्गदर्शक आहे. त्यामुळे तो प्रत्येक सामन्यात संघाला चीयर करण्यासाठी हजर असतो. परंतु या सामन्यात आयपीएलप्रेमींचे आकर्षण ठरल्या, सचिनची पत्नी अंजली तेंडूलकर आणि मुलगी सारा तेंडूलकर. कारण त्या दोघीही मुंबईला चीयर करण्यासाठी आल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायन्ट्स ः 20 षटकांत 4 बाद 199 (केएल राहुल नाबाद 103, क्विंटन डी कॉक 24, मनिष पांडे 38, दिपक हुडा 15. जयदेव उनडकत 2-32, मुरूगन अश्विन 1-33)
मुंबई इंडियन्स ः 20 षटकांत 9 बाद 181 (डिवाल्ड ब्रेव्हिस 31, सुर्यकुमार यादव 37, तिलक वर्मा 26, कायरान पोलार्ड 25, जयदेव उनडकत 14. आवेश खान 3-30)