नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या निवडणुका संपल्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी दहा रुपये वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहक बचत करण्याच्या मानसिकतेत असून एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत घट झाली असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोलची विक्री दहा टक्क्यांनी कमी झाली आहे तर याच काळात डिझेलची विक्री 15.6 टक्क्यांनी कमी झाली आहे. या कालावधीत विमानाच्या इंधनाच्या दरातही 20.5 टक्क्यांची वाढ झाली असून विमानाचे इंधन आता 113 रुपये प्रति लिटर या भावाने घेतले जात आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची बऱ्याच प्रमाणात विक्री झाली होती. कारण उत्तर प्रदेशातील निवडणुका जाहीर झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणे अपेक्षित होते. त्यानंतर 22 मार्च पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दैनंदिन पातळीवर वाढ करण्यात आली आहे. त्या अगोदर किरकोळ ग्राहकाबरोबरच पेट्रोल पंपांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी केली होती. त्यामुळे पेट्रोल पंपांना बराच नफा झाला होता.
स्वयंपाकाच्या गॅसच्या विक्रीतही घट
भारतामध्ये वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्यांची संख्या गेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गॅसच्या विक्रीत वाढ होत होती. मात्र एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये स्वयंपाकाच्या गॅसच्या विक्रीतही 1.7 टक्क्यांनी घट झाली आहे. याचा अर्थ लोकांकडून स्वयंपाकाच्या गॅसचा मर्यादित प्रमाणात वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. 22 मार्च रोजी स्वयंपाकाच्या गॅसचा दरामध्ये तब्बल 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जर जागतिक बाजारातील किमती कमी झाल्या नाहीत तर यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत येत नाही.