Rahul Narvekar – शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे वेळकाढूपणा करत आहेत, असा आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या 30 ऑक्टोबरला याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
नार्वेकर दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत. आमदार अपात्रताप्रकरणी 30 ऑक्टोबरपर्यंत नवे वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने वेळापत्रकात नेमके काय बदल करायचे, यावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी नार्वेकरांनी दिल्लीत धाव घेतल्याचे समजते.
दरम्यान, दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर राहुल नार्वेकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. नार्वेकर म्हणाले, आमदार अपात्रतेबाबत दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहे. हा माझा पूर्व नियोजित दौरा आहे.
आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी वेळापत्रक बदलाबाबत जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे, तो मी घेईन आणि लवकरच निर्णय देईन. राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनाही नोटीस पाठवली आहे. ही अपात्रतेबाबतची प्रक्रिया आहे.
दोनच दिवसांपूर्वी राहुल नार्वेकरांनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्याशीदेखील चर्चा केली. विधानसभा आमदारांविरोधातील अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीस जाणीवपूर्वक विलंब होत असल्याने सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी नार्वेकरांना दोन वेळा अत्यंत कठोर शब्दांत फटकारले आहे. 11 मे पासून अध्यक्षांनी केलेले नाही. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावेच लागेल, अशी टिप्पणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली आहे.