नवी दिल्ली – दिवंगत माजी कामगार मंत्री पी. एम. सय्यद यांच्या जावयाच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाल्यामुळे लक्षद्वीपचे खासदार पी. पी. मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र, ही खासदारकी त्यांना पुन्हा बहाल करण्यात आली आहे.
संसदेतील अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी होण्याआधीच लोकसभा सचिवालयाने त्यांना लोकसभेचे सदस्यत्व बहाल केले असल्याची माहिती बार आणि बेंचने दिली.
पदनाथ सालीह यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कावरत्ती येथील सत्र न्यायालयाने खासदार फैजल यांना आणि इतर तिघांना 10 वर्षांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे 13 जानेवारी 2023 रोजी मोहम्मद फैजल यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र, याप्रकरणी आता लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल केले आहे.
फैजल यांची लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. लोकसभा सचिवालयाची ही कारवाई बेकायदा असल्याचे त्यांनी या याचिकेत म्हटले होते. फैजल यांचे निलंबन मागे घेतल्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादीने स्वागत केले; परंतु लोकसभा सचिवालयाने केलेल्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचेही सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. मोहम्मद फैजल यांना खासदारकी पुन्हा मिळाली असल्याने राहुल गांधी यांनाही पुन्हा खासदारकी मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. परंतु, राहुल गांधी यांनी त्यांच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अद्याप अपील केलेले नाही.