नवी दिल्ली – नामिबियाहून भारतात आणलेल्या चित्त्याचा मृत्यूने हळहळलेल्या चित्ताप्रेमींसाठी आता आनंदाची बातमी आहे. मध्यप्रदेशातील ज्या कुनो राष्ट्रीय उद्यानात “साशा’ नामक मादी चित्त्याचा मृत्यू झाला, त्याच उद्यानातील दोन मादी चित्ता गर्भवती होत्या. त्यातील एकीने चार पिलांना जन्म दिला आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्वीट करत माहिती दिली.
तसेच मादी चित्ता आणि चार लहान पाहुणे सध्या पूर्णपणे निरोगी आहेत. चित्ता संवर्धन प्रकल्पात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी नवीन पाहुण्यांच्या आगमनावर आनंद व्यक्त केला आहे.
अमृत कालच्या काळात वन्यजीव संवर्धनाच्या इतिहासात एक महत्त्वाची आणि आनंदाची घटना घडली आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात स्थलांतरित करण्यात आलेल्या मादी चित्त्याने चार शावकांना जन्म दिला आहे, असे ट्विट भूपेंद्र यादव यांनी केले.
भारतातील वन्यजीव लोकसंख्येमध्ये चित्तांचा पुन्हा समावेश करण्यासाठी हे उद्यान योग्य अधिवास म्हणून तयार केले जात आहे. त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त, मोदींनी नामिबियामधून आणलेले आठ चित्ते सोडले. ज्यामध्ये पाच नर आणि तीन मादी चित्ते आहेत. अलीकडेच एका मादी चित्ता साशाचा संसर्गामुळे मृत्यू झाला होता.
उद्यानात असलेल्या तिच्या जागेत ती मृतावस्थेत आढळली. तिची किडनी निकामी झाल्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होते. परंतु मुत्रपिंडाच्या आजाराने साशाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.