इस्लामाबाद – पाकिस्तानते माजी पंतप्रधान इम्रान खान हे जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असे पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी म्हटले आहे. मंगळवारी संसदेत बोलताना शेहबाझ शरीफ यांनी इम्रान खान “फ्रॉड’ असल्याचे सांगून त्यांच्याबरोबर चर्चेची कोणतीही शक्यता फेटाळून लावली.
ज्या व्यक्तीने देशाला लुटले, न्यायपालिकेवर हल्ला केला, ज्या व्यक्तीचा राज्यघटनेवर आणि न्यायावरही विश्वास नाही, अशा व्यक्तीशी आपल्याला कोणतीही चर्चा करायची नाही, असे शेहबाझ शरीफ म्हणाले.
पाकिस्तानमधील सध्याच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आणि या मुद्द्यांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यावेळी शरीफ बोलत होते.
जो व्यक्ती सातत्याने कोविड, दहशतवादाची स्थिती, सर्वोच्च कमिटीची बैठक किंवा काश्मीर या सर्व मुद्द्यांवरील चर्चेचा प्रस्ताव नाकारत राहिला आहे, अशा व्यक्तीशी कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. इम्रान खान यांना वेगवेगळ्या प्रकरणात एकामागोमाग एक दिलासा मिळत आहे, ही न्यायाची चेष्टा आहे, असे शरीफ म्हणाले.
पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी विरोधकांवर खोटी प्रकरणे दाखल केली. नाणेनिधीची मदत मिळवण्यासाठी त्यांनी करार केला आणि स्वतःच त्या कराराचे उल्लंघन केले. न्यायाधीश महिलेला धमकावल्याबद्दल इम्रान खान यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.