नवी दिल्ली – नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी ईडी कार्यालयामध्ये हजर होण्याआधीच काँग्रेसवाले आक्रमक स्वरूपात दिसले. राहुल गांधी यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थनार्थ अनेक पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये लिहिले आहे की, प्रिय मोदी आणि शहा, हे राहुल गांधी आहेत, झुकणार नाही. मी सावरकर नाही, राहुल गांधी आहे, असेही पोस्टर्समध्ये लिहिले आहे. सत्यापुढे न झुकण्याचेही पोस्टर्समध्ये लिहिले आहे.
ईडीच्या समन्सनंतर काँग्रेसने मोठा मेळावा घेण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर काँग्रेस कार्यालय ते ईडी कार्यालयापर्यंत कलम 144 लागू करण्यात आले. या मार्गावरून कोणालाही जाण्याची परवानगी नाही. राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काँग्रेस मुख्यालयासमोरून राहुल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल-सोनिया यांना दिलेल्या नोटिसांच्या निषेधार्थ काँग्रेसने आज ‘सत्याग्रह’च्या नावाने ठिकठिकाणी निदर्शने केली. यादरम्यान अनेक बडे नेते, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर प्रियंका गांधीही त्यांना भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील तुघलक रोड पोलीस ठाण्यात नेलेल्या काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यात केसी वेणुगोपाल, हरीश रावत यांच्याशी संवाद साधला आणि त्यांची प्रकृती जाणून घेतली.
राहुल गांधी कार्यालयात हजर होण्याआधी त्यांच्यासोबत असलेल्या केसी वेणुगोपाल, हरीश रावत, अधीर रंजन चौधरी यांच्यासह काही बड्या नेत्यांना तुघलक रोड पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. यावेळी काँग्रेस नेते येथे ‘रघुपती राघव राजा राम’ हे गाणे गाताना दिसले. पोलिसांनी केसी वेणुगोपाल यांना मारहाण केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. पोलिसांच्या अशा कारवाईविरोधात संसदेच्या पुढील अधिवेशनात ठराव मांडणार असल्याचे सांगण्यात आले.
राहुल गांधी हे सावरकरांबाबत अत्यंत आक्रमक आहेत. आरएसएस, भाजप सोबतच मोदी आणि सावरकर हे सगळे डरपोक असल्याचे ते म्हणाले होते. ते म्हणाले होते की व्ही. डी. सावरकरांना वीर सावरकर म्हणतात, पण तुरुंगातून सुटका झाल्याबद्दल त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती. तेव्हा सावरकरांच्या नातेवाईकाने हे आरोप फेटाळून लावत त्यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती.