बंगळुरू – काँग्रेस नेते राहुल गांधी शुक्रवारी बेंगळुरूमध्ये होते. येथे पक्षाच्या नेत्यांना संबोधित करताना त्यांनी कर्नाटक सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे म्हटले. भाजप आर्थिक हस्तांतरण पद्धतीवर काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप गरिबांकडून पैसे घेऊन देशातील निवडक श्रीमंत उद्योगपतींना देत असल्याचे त्यांनी म्हंटले.
राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसला नेहमीच पाठिंबा असल्याची भावना राहिली आहे. 150 पेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार नाहीत हे आपण अगदी स्पष्ट असायला हवे. कर्नाटकला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणू. काँग्रेस नेते म्हणाले की, कर्नाटकात कोण काम करत आहे हे शोधणे खूप सोपे आहे. कामाच्या जोरावर आमची तिकिटे निश्चित करावीत. पक्षासाठी कोण काम करतंय हे पाहिलं पाहिजे. आपल्याला निकराच्या लढाईसाठी निवडणुका लढवायच्या नाहीत, तर निर्णायक पद्धतीने सरकार स्थापन करायचे आहे.
राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कर्नाटक युनिटचे अध्यक्ष डीके शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली.
दरम्यान, कर्नाटकात 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी 12 मे 2018 रोजी निवडणूक झाली होती. यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, पण बहुमतासाठी त्याला आणखी 9 जागांची गरज होती.
दरम्यान, 80 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने आणि 37 जागा जिंकणाऱ्या जेडीएसने युतीची घोषणा केली होती, परंतु राज्यपाल वजुभाई वाला यांनी 17 मे रोजी बीएस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. मात्र, 19 मे रोजी विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले आणि त्यांनी राजीनामा दिला.
यानंतर राज्यात जेडीएस नेते कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार स्थापन झाले, त्यांचे सरकारही बंडखोरांमुळे पडले. त्यानंतर 26 जुलै 2019 रोजी येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले. तथापि, जुलै 2021 मध्ये येडियुरप्पा यांनाही भाजपने हटवले आणि बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री बनवले. बोम्मई हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत.