नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्तणूक पंतप्रधानपदाला साजेशी नाही. ते पंतप्रधानपदाचा दर्जा राखत नाहीत अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. मोदींनी काल ट्युबलाईट असा शब्दप्रयोग करून राहुल गांधी यांच्यावर टिपण्णी केली होती त्यावर आज संसदेच्या आवारात बोलताना त्यांनी हा पलटवार केला.
ते म्हणाले की पंतप्रधानपदाला एक विशिष्ट दर्जा असतो. या पदावरील व्यक्तीने त्या दर्जाला साजेशी वर्तणूक ठेवणे अपेक्षित असते. पण आपल्या पंतप्रधानांकडे ती समज नाही. काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी राहुल गांधी यांच्या बेरोजगार पंतप्रधानांना दंडा मारतील असे विधान केले होते त्याचा संदर्भ देत काही टिप्पणी केली. त्यावेळी राहुल गांधी यांनी सभागृहातच उठून त्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्या अनुषंगाने बोलताना पंतप्रधान म्हणाले की मी गेली तीस-चाळीस मिनीटे सभागृहात बोलतो आहे. पण आत्ता त्यांना जाग आलेली दिसते आहे. अनेक ट्युब लाईट अशाच असतात अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली होती. त्या अनुषंगाने आज पत्रकारांनी आज राहुल गांधी यांना बोलते करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी वरील प्रतिक्रीया दिली.
भाजपच्या सदस्यांनी आज सभागृहात पुन्हा राहुल गांधी यांनी मोदींविषयी दंडा हा शब्द वापरून केलेल्या विधानाचा विषय उपस्थित केला. त्यावरून आज कॉंग्रेस व भाजप सदस्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्तारूढ पक्षाकडून केला जात आहे असा आरोपहीं राहुल गांधी यांनी केला.