मनिष सिसोदियांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

सिसोदियांनी केले कारवाईचे समर्थन

नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या कार्यालयातील ओएसडी गोपालकृष्ण माधव यांना दोन लाख रूपयांची लाच घेताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली आहे. त्यावरूनही दिल्लीचे राजकारण तापले आहे. दिल्लीत उद्या मतदान आहे. त्याच्या आदल्या दिवशी ही कारवाई करण्यामागे राजकारण असल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या काहीं समर्थकांकडून केला जात असला तरी मनिष सिसोदिया यांनी मात्र या कारवाईचे समर्थन केले असून या अधिकाऱ्याला कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार भ्रष्टाचाराच्या संबंधात झिरो टॉलरन्सचे धोरण अवलंबत आहे असे त्यांनी म्हटले आहे.

गोपालकृष्ण माधव यांनी कर थकबाकीच्या संबंधातील एक प्रकरण मिटवण्यासाठी संबंधीताकडून दोन लाख रूपयांची लाच घेतली आहे. ही लाच घेतानाच त्यांना अटक करण्यात आली आहे. यावर मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे की माझ्या कार्यालयातील अधिकाऱ्याला सीबीआयने लाच घेताना अटक केल्याची माहिती मला मिळाली आहे.

सीबीआयच्या या कारवाईचे मी समर्थनच करतो. कोणत्या टायमिंगला ही कारवाई करण्यात आली हे माझ्यासाठी महत्वाचे नाही. भ्रष्टाचार करणाऱ्याला मोकळीक मिळताच कामा नये अशीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. हा अधिकारी सन 2015 पासून मनिष सिसोदिया यांच्या कार्यालयात ओएसडी म्हणजेच ऑफीसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून काम करीत आहे.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या प्रकरणी आम आदमी पक्षावर जोरदार टीका करताना म्हटले आहे की या अधिकाऱ्याने एकूण दहा लाखांची लाच मागितली होती त्यातील दोन लाख घेताना त्याला पकडण्यात आले आहे. स्वत:ला आम आदमी समजून ते सगळेच चोऱ्या करीत आहेत असे त्यांनी म्हटले आहे .त्यांनी दिल्लीत लोकपाल का आणला नाही, हे आता लोकांना समजले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

तथापी आम आदमी पक्षाच्या सरकारने जनलोकपाल विधेयक संमत करून ते मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवले आहे पण केंद्र सरकारनेच गेले चार वर्षे हे विधेयक प्रलंबीत ठेवले आहे असा दावा दोनच दिवसांपुर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.