राहुरी – 26000 दशलक्ष घनफूट क्षमतेचे मुळा धरण आज (सोमवार) संध्याकाळी क्षमतेच्या 75 टक्के भरले. धरणात आज सायंकाळी सहा वाजता 19 हजार 483 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता, अशी माहिती शाखा अभियंता रावसाहेब पारखे यांनी दिली.
धरणात 19 हजार 500 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला म्हणजे धरण क्षमतेच्या 75 टक्के भरले आहे. धरणातील पाण्याची आवक कोतूळला 2 हजार 247 क्यूसेक एवढी होती. यंदाच्या पावसाळ्यात धरणात 10 हजार 736 दशलक्ष घनफूट पाणीसाठा नवीन आला. यंदाच्या पावसाळ्यात तीन जुलैला धरणात नवीन आवक सुरू झाली. आठ जूनला मुळा धरणात आठ हजार 755 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. दोन महिन्यांत धरणात 10 हजार 728 दशलक्ष घनफूट पाणी नवीन आले. गतवर्षी या तारखेला मात्र जास्त पाणीसाठा होता.
गतवर्षी आजच्या तारखेला 20 हजार 277 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. या तारखेला गतवर्षी आजच्या तुलनेत 777 दशलक्ष घनफूट पाणीसाठा अधिक होता. दि. 24 जुलै रोजी धरण निम्मे भरले होते.धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आलेला आहे .या पावसाळ्यात अद्यापपर्यंत कालव्याच्या आवर्तनाचा विषय आलेला नाही. फक्त पिण्याकरिता मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले होते.
गत पाच वर्षांत मुळा धरणात 75 टक्के पाणीसाठा 2022 – 29 जुलै, 2021- 6 सप्टेंबर, 2020- 19 ऑगस्ट, 2019 – 6 ऑगस्ट, 2018 – 26 ऑगस्ट या तारखांना होता.