शेवगाव – तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे संतप्त दूध उत्पादकांनी सरकारच्या फसव्या दूध दरवाढीविरुद्ध रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला. दूधउत्पादकांच्या रास्ता रोकोला प्रशासनाने परवानगी नाकारून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. त्याच्याही निषेधार्थ दूधउत्पादकांनी तीव्र भावना व्यक्त करत सरकारचा निषेध केला.
ग्रामीण भागात दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोड धंदा असून, दैनंदिन गरजा भागवताना दुधाचा मोठा आधार होत असतो. सरकारने दुधाला 34 रुपये प्रतिलिटर दर जाहीर केला. परंतु एसएनएफ व फॅटच्या जाचक अटी लावल्यामुळे दूधउत्पादकांना अवघा 23-24 रुपये प्रतिलिटर दर मिळत असल्याने दूधउत्पादकांचा आर्थिक तोटा होत आहे. सरकारने असे करून दूधउत्पादकांची चेष्टाच केली आहे, असा आरोप शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी या वेळी केले.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांना दुधासाठी सुमारे 25 रुपये प्रतिलिटर खर्च येतो.सध्या दुधाला मिळणारे दर न परवडणारे आहेत. पूर्वी दुधाला एस.एन.एफ. व फॅटला 20 ते 25 पैसे कटिंग होत होती. परंतु आत्ता प्रत्येक पॉइंटला एक रुपया कापला जात आहे. त्यामुळे दूध व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
दूधउत्पादक बाळासाहेब काळे म्हणाले की, पशुखाद्याचे दरसुद्धा अवाजवी आहेत. त्यामुळे दूध धंद्यात होणारा खर्च व मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. या वेळी राहुल बेडके, राजेंद्र आढाव, राजेंद्र फटांगरे, शंकर नारळकर, श्यामराव सावंत, जालिंदर आहेर, डॉ. सय्यद, योगेश मेरड, सचिन मेरड, संतोष गांडुळे, जालिंदर समृत आदींसह दूधउत्पादक उपस्थित होते.