औंध, दि. 23 (प्रतिनिधी) -बाणेर येथील सर्वे नंबर 225/3 मध्ये मुळा नदीकडेला “ब्ल्यू लाइन’मध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात येत असल्याने पर्यावरणावर परिणाम होत आहे. नदीकडेला अनेक बांधकाम व्यवसायिक सर्रासपणे राडाराडा टाकतात. याकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करीत असून केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुळा नदीच्या “ब्लू लाइन’मध्ये रात्रीच्या वेळी राडाराडा टाकला जात असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. या राड्यारोड्यामुळे मैलापाणी शुद्धीकरण केंद्रापुढे असलेला मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचा थर साचून चिखल झाला आहे. त्यातच अवजड वाहनांतून राडारोडा आणला जात असल्याने या रस्त्यावर खड्डे पडून हा रस्ताही निरूपयोगी होऊ लागला आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. टाकलेल्या राडारोड्याबाबत प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे पर्यावरण प्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे. सदर “ब्ल्यू लाइन’मध्ये टाकलेला राडारोडा लवकरात लवकर उचलावा, संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सदर बाबीची माहिती घेऊन अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्यात आली आहे. या ठिकाणी बांधकाम विभागामार्फत याआधी देखील नोटीस देण्यात आल्या आहेत. संबंधितांवर नोटीस बजावून राडारोडा उचलण्यास सगण्यात आले आहे. संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या पुढेही अशीच कारवाई सुरू ठेवण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
– संदीप खलाटे, सहाय्यक आयुक्त, औंध-बाणेर